तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर नयना गुंडे यांनी स्वीकारला ‘पीएमपीएमएल’चा कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:11 PM2018-02-12T15:11:55+5:302018-02-12T15:14:02+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) शिस्त लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीनंतर सोमवारी नयना गुंडे यांनी कार्यभार स्वीकारला.
पुणे : मागील दहा महिन्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) शिस्त लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीनंतर सोमवारी नयना गुंडे यांनी कार्यभार स्वीकारला. त्या ‘पीएमपी’च्या पहिल्या महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ठरल्या आहेत. यापुर्वी गुंडे या वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.
राज्य शासनाने मागील आठवड्यात मुंढे यांचा नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली केली. त्यांच्याजागी गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मार्च अखेरीस ‘पीएमपी’मध्ये आल्यानंतर मुंढे यांनी सुरूवातीपासूनच अधिकारी व कर्मचाºयांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले. तसेच शेकडो कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी मुंढे यांच्या बदलीसाठी मोर्चा उघडला होता. तसेच मुंढे यांच्या काही निर्णयांवर प्रवासी संघटनाही नाराज होत्या. मुंढे यांच्या बदली झाल्यामुळे अनेकांनी त्यावर टीकाही केली. मुंढे यांच्याकडून पुणेकरांना अपेक्षा होत्या. त्यानुसार त्यांनी कामाला सुरूवातही केली होती. मात्र, त्यांना केवळ दहा महिन्यांचा कालावधी मिळाला. या पार्श्वभूमीवर गुंडे यांनी दुपारी ‘पीएमपी’ची सूत्रे हाती घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘पीएमपी’चे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुंडे यांनी अधिकाऱ्यांकडून कामकाजाविषयी माहिती घेतली.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही वादग्रस्त निर्णय रद्द करण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून प्रयत्न केले जाणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर झालेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे. बदल्यांच्या मुद्यावरही प्रचंड नाराजी आहे. तसेच पास दरामध्ये बदल करणे, पंचिंग पास बंद करणे अशा काही निर्णय बदल्याण्यासाठी प्रवासी संघटनाही प्रयत्नशील आहे. त्यामुळे गुंडे यांच्यावर मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय बदलण्यासाठी दबाव असणार आहे. मुंढे यांनी प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी विविध निर्णय घेतले. आस्थापना आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यावरही कर्मचारी संघटना नाराज आहेत. ‘पीएमपी’ची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच आराखडा तयार झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान गुंडे यांच्यासमोर असेल. तसेच प्रवाशांना आवश्यक सोयी-सुविधा, ब्रेकडाऊनचे प्रमाण, नवीन बसेस, बीआरटी, आयटीएमएस यंत्रणा, बसेसची देखभाल-दुरूस्ती, दोन्ही महापालिकांशी समन्वय, निधी मिळविणे, तोटा कमी करणे अशा विविध आघाड्यांवर गुंडे यांना काम करावे लागणार आहे.