तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पीएमपीएमएल वाहक-चालकांची प्रवाशांवर अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:30 PM2018-02-26T13:30:16+5:302018-02-26T13:30:16+5:30
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, पुन्हा बेशिस्त वाढू लागल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. काही चालक-वाहकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन केले जात असून, ‘कुणाकडेही तक्रार करा’ असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
मात्र, तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. रविवारी कोथरूड बसस्थानकात एका बस (एमएच १४ सीडब्ल्यु १४९२) मध्ये प्रवाशांना हा अनुभव आला. स्थानकात अडीच वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना बसमध्ये २० मिनिटांहून अधिक काळ एकाच जागेवर बसावे लागले. याबाबत बसमधील एका ज्येष्ठ महिला प्रवाशांनी चालकाला हटकले असता, त्याने ‘आधीच्या बसमध्ये का गेला नाही, झोपला होता का,’ असे म्हणून हात झटकले; तसेच यावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ‘कुणाकडे तक्रार करायची ते करा. बसमध्ये नंबर आहेत,’ अशा भाषेत त्याने प्रवाशांनाच सुनावले. त्यामुळे बेशिस्त चालक-वाहकांना पुन्हा शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेच परत यावेत, अशी अपेक्षा प्रवाशांनी या वेळी व्यक्त केली. हा बसचालक ठेकेदाराकडील असल्याचे समजते.
मुंढे यांनी पीएमपीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर, पहिल्या दिवसापासून सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. पहिल्याच दिवशी त्यांनी कामाच्या वेळेत बदल करून त्याची सुरुवात केली. कामाच्या वेळा पाळण्याबरोबरच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील वावर, चालक व वाहकांचे प्रवाशांशी संभाषण, त्यांचे वर्तन याबाबतीत पावले उचलली होती. बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लगेचच कारवाई होत असल्याने शिस्त पाळली जात होती. त्यामुळे बस वेळेवर मार्गावर आणणे, प्रवाशांशी चांगले बोलणे याचा अनुभव बसमधील प्रवाशांना येत होता.