ट्रान्सफॉर्मर जळाल्याने भोर तालुका अंधारात

By admin | Published: July 28, 2016 03:56 AM2016-07-28T03:56:09+5:302016-07-28T03:56:09+5:30

भाटघर वीजनिर्मिती केंद्रातील दोन ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मंगळवारी रात्री ७ वाजल्यापासून भोर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज कंपनीने रात्री १२.३० वाजता तात्पुरत्या

After the transformer burns, Bhor taluka is in the dark | ट्रान्सफॉर्मर जळाल्याने भोर तालुका अंधारात

ट्रान्सफॉर्मर जळाल्याने भोर तालुका अंधारात

Next

भोर : भाटघर वीजनिर्मिती केंद्रातील दोन ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मंगळवारी रात्री ७ वाजल्यापासून भोर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज कंपनीने रात्री १२.३० वाजता तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत केला होता; मात्र विजेचा लोड घेत नसल्याने सकाळी ६ वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात बत्ती गूल झाली आहे.
सदरच्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती त्वरित झाली नाही, तर तालुक्यातील ५ फीडरवर भारनियमन करावे लागणार आहे; मात्र वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांना विनाकारण भारनियमनाला सामोरे जावे लागणार असल्याने कंपनीच्या कारभाराबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
भोर येथील भाटघर धरणाखाली १९७७ साली वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यात आले होते. धरणाच्या पाण्यावर सुमारे १६ मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. सुरुवातील १० एम.व्ही.एचा एक ट्रान्सफॉर्मर होता. मात्र, विजेची मागणी वाढल्याने त्यातील वीजपुरवठा कमी पडत असल्याने त्यानंतर १९८५ साली १२.५० एम.व्ही.एचा दुसरा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला. भाटघर वीजनिर्मिती केंद्रातून भोर शहर फीडर, भोर ग्रामीण फीडर यात उत्रौली, वीसगाव व चाळीसगाव खोरे, पसुरे फीडर यात भाटघर धरण भागातील वेळवंड, भुतोंडे खोऱ्यातील गावे, हिर्डोशी फीडरवर महुडे खोऱ्यातील शेतीपंप, वेल्हे फीडरवर महामर्गावरील शेतीपंपांचा समावेश आहे.
या सर्व फीडरला साधारणपणे ५ मेगावॉट वीज लागते. मात्र, पाऊस नसल्याने सध्या ८ मेगावॉट विजेची गरज भासत आहे. मात्र, ९ जुलैला भाटघर वीजनिर्मिती केंद्रातील १२.५० एम.व्ही.ए ट्रान्सफॉर्मर जळाल्याने दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर लोड आला. २६ जुलै रोजी रात्री ७ वाजता दुसरा ट्रान्सफॉर्मरही जळाल्याने भोर शहरासह संपूर्ण भोर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, वीज वितरण कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून मंगळवारी रात्री १२ वा. वीजपुरवठा सुरू केला होता. मात्र, पुन्हा लोड आल्याने सकाळी ६ वाजता वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो आज दुपारी ४ वाजता पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. वीजवितरण कंपनीच्या जनरेशन (महाजनको), ट्रान्समेशन (पारेशन), डिस्ट्रीब्युशन (वितरण) तीन उपकंपन्या करण्यात आल्या आहेत. मात्र, महाजनकोकडून वीज तयार करून ट्रान्सर्फर करण्याचे काम पारेशनकडे आहे. मात्र, भाटघर वीजनिर्मिती केंद्रात जनरेशन एकच कंपनी काम करीत आहे. २०१० पर्यंत ६० कामगार होते. (वार्ताहर)

सदरचे दोन्ही ट्रान्सफॉर्मर त्वरित दुरुस्त करावे लागणार आहेत. मात्र, सदरचे ट्रान्सफॉर्मर जुने असल्याने ते त्वरित दुरुस्त होतील का नाही, याबाबत शंका आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या पर्यायी व्यवस्थेवर विजेचा लोड येत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. भारनियमन करण्याशिवाय कोणताच पर्याय वीज वितरण कंपनीपुढे राहणार नाही.

भोर तालुक्यातील ५ फीडरवरील शेतीपंपांना आणि घरगुती व कंपन्यांना सुमारे ५ मेगावॉट वीज लागते. मात्र, सध्या पाऊस नसल्याने अधिक प्रमाणात सुमारे ८ मेगावॉट वीज लागत आहे. दोन्ही ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वीजपुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे कालपासून भोर तालुका अंधारात असून शेतीपंप, पाणीपुरवठ्याचे पंप, पीठ गिरण्या, बंद असून भोर शहरासह संपुर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: After the transformer burns, Bhor taluka is in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.