Vasant More: वसंत मोरेंची महाआरतीनंतर चक्क ईदच्या मेजवानीला हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 02:12 PM2022-05-09T14:12:13+5:302022-05-09T14:13:07+5:30
वसंत मोरे यांनी फेसबुक पेजवर ईद साजरी केल्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे, ठाणे आणि औरंगाबादच्या सभेत भोंगे याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ईदनंतर भोंगे उतरवले नाहीत. तर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज यांनी केले होते. त्यानंतर आंदोलनात राज्यात अनेक ठिकाणी हनुमान चालीसा लावण्यात आली. तसेच काही भागात हनुमानाच्या आरतीचे आयोजनही करण्यात आले होते. या सर्वांमध्ये मनसेचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे राज्यात चर्चाना उधाण आल्याचे दिसून आले. पण वसंत मोरेंनी आंदोलनात सहभागी नसल्याचा खुलासा केला. आणि त्यानंतर पुण्यात महाआरतीचे आयोजन केले. त्यावेळी राज ठाकरे पुण्यात असूनही या महाआरतीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर पुन्हा वसंत मोरे यांच्याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. तर आता मोरे यांनी महाआरतीनंतर चक्क ईदच्या मेजवानीला हजर राहिल्याची फेसबुक पोस्ट टाकली आहे.
वसंत मोरे यांनी फेसबुक पेजवर ईद साजरी केल्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेजभाई शेख यांचे घरी जेवण केले आहे. यावेळी सुनील अंधारे (पाटील) पुणे शहर वाहतूक उपाध्यक्ष, शाखा अध्यक्ष अमितआण्णा जगताप, शाखा अध्यक्ष मंगेश रासकर आणि परिसरातील बरेच नागरिकही उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे महाआरतीला अनुपस्थित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. तेव्हा वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या फोटोचं महाआरती संदर्भात बॅनरही लावलं होतं. मात्र मोरे ज्यांचे हनुमान स्वतःला म्हणवून घेतात आणि ज्यांना श्रीरामाचा दर्जा त्यांनी आपल्या आयुष्यात दिलाय ते राज ठाकरे या महाआरतीला अनुपस्थित राहिले.