विठुरायाची भेट घेऊन माऊलींची वारी परतली स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:30+5:302021-07-25T04:10:30+5:30
- आषाढी वारी : ३ जुलैला माऊलींच्या पादुका समाधीवर होणार विराजमान लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : ‘ज्ञानोबा-माऊली-तुकारामांच्या’ जयघोषात शनिवारी ...
-
आषाढी वारी : ३ जुलैला माऊलींच्या पादुका समाधीवर होणार विराजमान
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : ‘ज्ञानोबा-माऊली-तुकारामांच्या’ जयघोषात शनिवारी (दि. २४) रात्री माऊलींचा सोहळा पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन स्वगृही परतला. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी तसेच आळंदीकरांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून संतांच्या पादुका बसद्वारे थेट पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला नेल्या होत्या. त्यानुसार आषाढी वारीसाठी माऊलींच्या चलपादुका दोन एसटी बसद्वारे अवघ्या चाळीस व्यक्तींसोबत पंढरीला नेण्यात आल्या होत्या. पंढरपूर येथे आषाढी एकादशी व बारशीच्या दिवशी विधिवत कार्यक्रम पार पडल्यानंतर माऊलींच्या पादुका त्याठिकाणी ‘श्री’च्या मंदिरात मुक्कामी होत्या. त्याठिकाणी दैनंदिन विधिवत पूजा केली जात होती.
शनिवारी (दि.२३) सकाळी विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा पार पडली. सकाळी आठ वाजता टाळ-मृदंगाच्या निनादात माऊलींची पालखी चंद्रभागा स्नानासाठी बाहेर पडली. विधिवत चंद्रभागेत स्नान झाल्यानंतर गोपाळपुरा येथे काल्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनतर माऊलींच्या चलपादुका पांडुरंगाच्या मंदिरात नेऊन विठुचरणी ठेऊन ‘माऊली व विठुरायाची’ अनोखी भेट घडवून आणण्यात आली. नगरप्रदक्षिणा व खिरापतीचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी साडेतीनला माऊलींचा सोहळा पोलीस बंदोबस्तात दोन्ही बसद्वारे आळंदीकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला.
रात्री दहाच्या सुमारास माऊलींचा सोहळा आळंदीत दाखल झाला. त्यानंतर परंपरेनुसार मंदिर प्रदक्षिणा, पूजा व आरती घेऊन माऊलींच्या चलपादुका कारंज्या मंडपात सजविलेल्या आसनावर स्थानापन्न करण्यात आल्या आहेत. कारंज्या मंडपात पुढील दहा दिवस विधिवत कार्यक्रम व पादुकांना नित्योपचार केले जातील. तर आषाढ शुद्ध दशमीला म्हणजेच ३ जुलैला माऊलींच्या पादुका मुख्य मंदिरात संजीवन समाधीवर विराजमान करून आषाढी सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
चौकट : पंढरपुरीहून परतीला निघालेला हा सोहळा वाखरी-लोणंद-फलटण-जेजुरी-पुणे-विश्रांतवाडी मार्गे वडमुखवाडीतील विसावा ठिकाण असलेल्या थोरल्या पादुका मंदिरात आरतीसाठी थांबला. त्याठिकाणी प्रथेप्रमाणे विधिवत श्री पांडुरंगाची व माऊलींची आरती संपन्न झाली. याप्रसंगी पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ : १) पंढरीत माऊलींच्या चलपादुका विठुरायाचरणी ठेऊन संतांची अनोखी भेट झाली. २) संत मुक्ताईचरणी साडी-चोळी अर्पण करण्यात आली. ३) पंढरपूर येथे माऊलींची पालखीतून नगरप्रदक्षिणा पार पडली. (छाया : भानुदास पऱ्हाड)