Firodiya Karandak: फिरोदियाचे नाटक पाहून अनुराग कश्यप भारावले अन् म्हणाले, नाटकातल्या कल्पना...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 02:22 PM2022-03-25T14:22:49+5:302022-03-25T14:23:01+5:30
पुणे : फिरोदिया करंडक स्पर्धेच्या रंगमंचावर जे पाहिलं ते खूप अद्भूत होतं. आजपर्यंत एकाच मंचावर विभिन्न आविष्कार सादर होताना ...
पुणे : फिरोदिया करंडक स्पर्धेच्या रंगमंचावर जे पाहिलं ते खूप अद्भूत होतं. आजपर्यंत एकाच मंचावर विभिन्न आविष्कार सादर होताना कधीच पाहिले नव्हते. चित्रपटांमध्ये आपण स्पून फिडिंग करायला जातो. पण या मंचावर केवळ पाऊण तासात चित्रपटाइतकं मोठं काम साकार झाले. संपूर्ण चित्रपट रंगमंचावर पाहायला मिळाला. इथं सादर झालेल्या नाटकातील काही कल्पना मी चोरूही शकतो, असे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी मिश्किलपणे सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून ते भारावून गेले. स्वत:हूनच स्वत:चा रस्ता शोधायला हवा. आपणच आपले गुरू व्हायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमीतर्फे आणि एचसीएल फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ‘सत्या’, ‘नायक’, ‘ब्लॅक फ्रायडे’ आदी विविध चित्रपटांसह ‘सिक्रेड गेम्स’ वेबसिरीज फेम अनुराग कश्यप यांच्या हस्ते जल्लोषात पार पडला. शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाला फिरोदिया करंडक प्रदान करण्यात आला. तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. याशिवाय वैयक्तिक विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली. महाविद्यालयाचे नाव उच्चारताच शिट्ट्या आणि टाळ्यांच्या निनादात विद्यार्थ्यांनी सभागृह दणाणून सोडले.
''इथं आल्याचा खूप आनंद झाला आहे. रंगमंचावर एकाच वेळी विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा वापर करून सादर केलेले विभिन्न कलाविष्कार पाहिले. नेपथ्य, लाईटिंगचा इतका व्यावसायिक कलाकारासारखा त्यांनी वापर केला, ते पाहून थक्क झालो. विद्यार्थी राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या सजग आहेत. तेच देशाचे भविष्य आहेत, असा विश्वास व्यक्त करीत, कश्यप यांनी पृथ्वी थिएटर्सच्या रंगमंचावरील त्यांचा पहिला अनुभव कथन केला. रंगमंचावर काही नसतं तेव्हा आपण स्वत:च गोष्टी निर्माण करतो. चित्रपटामध्ये मी वापरत असलेले ‘गोरीला शूट’ हे त्याचंच उदाहरण आहे. आपणच आपला रस्ता शोधायला हवा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.''