गोवा जिंकल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे 'मिशन पुणे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 02:52 PM2022-03-12T14:52:52+5:302022-03-12T14:54:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेससमोर फडणवीस नावाचे चॅलेंज या निवडणुकीत कायम राहणार आहे...
निलेश राऊत
पुणे : गोव्यात भाजपची सत्ता टिकविण्याचे दिव्य यशस्वीरीत्या पेलणाऱ्या देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी, पुणे महापालिकेत भाजपची दुसऱ्यांदा सत्ता आणण्यासाठी विविध विकास प्रकल्पांसाठी प्रयत्न केले आहेत, तसेच त्यात यश मिळविले आहे. देशाचे शहा यांना महापालिकेत आणून भाजपचे पारडे जड करण्यात त्यांचे विशेष प्रयत्न राहिले आहेत. यामुळे महापालिकेतील सत्ता मिळविण्याचा चंग बांधलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर फडणवीस नावाचे चॅलेंज या निवडणुकीत कायम राहणार आहे.
कोरोना आपत्तीत सत्ताधारी भाजपची दोन वर्षे कोणत्याही नव्या कामाशिवाय खर्ची पडली. त्यातच राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतरही २०१९ पासून फडणवीस यांनी सत्ता नसतानाही शेवटच्या टप्प्यात महापालिकेच्या विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात केंद्राकडून चालना मिळवून दिली. मेट्रोचे पाच किलोमीटर अंतराचे उद्घाटन व गेली कित्येक वर्षे चर्चेच्या गोत्यात अकडलेले जायका (नदी सुधार प्रकल्प), नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प यांना मान्यता घेऊन त्याचे भूमिपूजन करून एका मागे एक चौकारच मारले. महापालिकेतील प्रत्येक कारभारात त्यांनी व्यक्तीशः लक्ष घातले.
महापालिकेच्या विविध प्रकल्पांना केंद्रातून मान्यता मिळवण्यासाठी फडणवीस यांचे योगदान मोलाचे राहिले. महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राकडून मान्यता मिलावी याकरिता त्यांनी केंद्र सरकार दरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व अखरीस त्यास मान्यता मिळवून दिलीच.
मुख्यमंत्री पदावर असताना पुण्याकडे विशेष लक्ष देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरनंतर सेकंड हाऊस पुणेच राहिले. पुण्याशी विशेष जवळीक असलेल्या फडणवीस यांनी सन २०१७ मध्ये १०० नगरसेवकांच्या उच्चांकी आकड्याने भाजपला एकहाती सत्तेत बसविले. या पाच वर्षांत शहरातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून, पक्षांतर्गत संघटनबदल, स्थानिक नेतृत्वाची मोट बांधणे, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात राहून महापालिकेतील कारभाराची माहिती घेणे, पक्ष संघटन मजबूत करणे यात सातत्य ठेवून, शहर भाजपवर एकहाती अंकुश कायमच ठेवला आहे.
'अबकी बार शंभरी पार' हेच ध्येय ठेवून शहर संघटनेला सूचना-
.. महापालिकेच्या निवडणुकांसाठी चारचा प्रभाग तीनचा केला गेला तरी, तयार करण्यात आलेल्या नव्या प्रभाग रचनामध्ये त्यांनी आवर्जून रस दाखविला. राज्य शासनाच्या विधेयकामुळे आता प्रभाग रचना मतदार याद्या तयार करण्याचा काळ लक्षात घेता निवडणुका सहा महिने पुढे गेल्या असल्या तरी, प्रभाग रचना कशीही होवो 'अबकी बार शंभरी पार' असेच ध्येय ठेवून त्यांनी शहरातील पक्ष संघटनेला सूचना केल्या आहेत.
पुण्यातील छोट्या-मोठ्या गोष्टीत फडणवीस यांचे लक्ष आहे. त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा यासाठी काम करीत असून, सर्व राजकीय घडामोडीवर त्यांचा वॉच आहे. भाजपमधील स्थानिक नेतृत्वाबरोबर विरोधकांचे बारकावेही ते नेहमीच टिपत राहिले. यामुळे गोव्याची यशस्वी कामगिरी करणारे फडणवीस आता महापालिकेत पुन्हा भाजपला एकहाती सत्ता मिळवून देतील, हा विश्वास शहर भाजपमध्ये आहे.