Aga Khan Palace: आगाखान पॅलेसमधील बाग पुन्हा फुलणार; महापालिकेने उपलब्ध करून दिला 'हा' पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:53 PM2022-03-24T12:53:10+5:302022-03-24T12:53:24+5:30
पुणे : राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसच्या परिसरातील महात्मा गांधीनी फुलवलेली बाग पाण्याअभावी कोमेजली होती. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने ...
पुणे : राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसच्या परिसरातील महात्मा गांधीनी फुलवलेली बाग पाण्याअभावी कोमेजली होती. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने महापालिकेने या बागेचा पाणीपुरवठा बंद केला होता. परिणामी पर्यटकांना कोमजलेली बाग पाहायला मिळत होती. त्यावर उपाय म्हणून बागेला पाणी पुरवण्यासाठी महापालिकेने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आगाखान पॅलेसमधील सुकलेल्या बागेला महापालिकेने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांमधून शुद्ध केलेले पाणी बागेसाठी मोफत देण्यात येणार असून, पॅलेस व्यवस्थापनाने ते टँकरद्वारे घेऊन जावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान, आगाखान पॅलेसच्या व्यवस्थापनाने अरकॅलॉजी डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून थकीत असलेली दोन कोटी रुपयांची पाणीपट्टी भरण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील असे आश्वासन महापालिकेला दिले आहे.
आगाखान पॅलेसला महापालिकेने तीन नळजोड दिले असून, यापैकी बागेसाठी वापरण्यात येणारा नळजोड महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने तोडला होता. यामुळे बागेला पाणी मिळत नसल्याने, पाण्याअभावी बाग सुकली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पॅलेस व्यवस्थापनाला वारंवार सूचना करूनही थकबाकी न भरणाऱ्या आगाखान पॅलेस व्यवस्थापनाशी महापालिकेने चर्चा केली. तसेच महापालिकेच्या धोरणानुसार बागेच्याकरीता प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे याठिकाणी महापालिकेने आज उपलब्ध करून दिले आहे़ येथून पुढेही महापालिकेच्या जवळच्या एसटीपी प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी आगखान पॅलेसला मोफत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.