पुन्हा समाजप्रबोधनाकडे
By admin | Published: September 11, 2016 01:34 AM2016-09-11T01:34:09+5:302016-09-11T01:34:09+5:30
स्त्रीभ्रूणहत्येविषयी जागृती ते आॅलिम्पिक पदकविजेत्या महिला खेळाडूंचा सन्मान... स्वच्छतेच्या संदेशापासून व्यसनमुक्तीचा जागर
पुणे : स्त्रीभ्रूणहत्येविषयी जागृती ते आॅलिम्पिक पदकविजेत्या महिला खेळाडूंचा सन्मान... स्वच्छतेच्या संदेशापासून व्यसनमुक्तीचा जागर... लैंगिक शिक्षण ते लोकशिक्षण अन् पाणीबचतीपासून वृक्षारोपण... अशा विविध लोकजागर करणाऱ्या देखाव्यांनी यंदाचा लोकोत्सव रंगला आहे. लोकप्रबोधनपर देखाव्यांचे वाढलेले प्रमाण हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शहराच्या मध्य भागासह उपनगरांमध्येही लहानमोठ्या अनेक मंडळांनी जिवंत, हलत्या देखाव्यांसह संदेशपर फलक लावून जनजागृतीवर भर दिला आहे.
मागील काही वर्षांपासून छोटे-मोठे देखावे तयार करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. काही वर्षांपर्यत पौराणिक, ऐतिहासिक, देशभक्तिपर देखाव्यांवर मंडळांचा भर होता. आता पुरोगामी महाराष्ट्राला साजेसे असे समाजप्रबोधनपर देखावे करण्याकडे मंडळांचा कल वाढल्याचे दिसत आहे.
स्त्रीभू्रणहत्या, स्वच्छतेचा संदेश, महिलांवर होणारे अत्याचार, स्वच्छ पुणे, कचरामुक्त पुणे, पाणीबचत, रेनवॉटर हार्वेस्टिंग, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, अनाथ मुले, साक्षरता, जीवघेणा सेल्फी, लैंगिक शिक्षण, हुंडाबळी, वृक्षारोपण, मुलींचे शिक्षण, शासकीय योजनांची माहिती असे विविध विषय घेऊन मंडळे गणेशभक्तांचे प्रबोधन करीत आहेत.
सेल्फी विथ गाडगेमहाराज
कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने सादर केलेल्या ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’, ‘सेल्फी विथ गाडगेमहाराज’ या देखाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कचरा कसा निर्माण होतो, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कचऱ्याचे प्रकार, त्याच्या वर्गीकरणाची गरज, तो वेगळा ठेवण्याच्या पद्धती, सफाई कर्मचाऱ्यांचे काम, स्वयंसेवी संस्थांच्या भूमिका, कचऱ्यापासून खत, बायोगॅस, वीजनिर्मिती या विषयांचा १० मिनिटांच्या जिवंत देखाव्यात समावेश आहे.