डक्टचे वादग्रस्त काम पुन्हा एस्टिमेट कमिटीकडे
By admin | Published: June 30, 2017 04:03 AM2017-06-30T04:03:00+5:302017-06-30T04:03:00+5:30
समान पाणीपुरवठा योजनेत घुसवण्यात आलेले केबलसाठीच्या डक्टचे २२५ कोटी रुपयांचे काम आता पुन्हा एकदा महापालिकेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेत घुसवण्यात आलेले केबलसाठीच्या डक्टचे २२५ कोटी रुपयांचे काम आता पुन्हा एकदा महापालिकेच्या एस्टिमेट कमिटीपुढे मंजुरीसाठी आले आहे. याआधी दोन वेळा समितीने या कामाला नकार दिला असून तरीही या कामासह सर्वसाधारण सभेने पाणी योजनेच्या कामासाठी साधारण २ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यास मंजुरी दिली आहे.
महापालिकेच्या कोणत्याही कामाला एस्टिमेट कमिटीची मंजुरी लागते. त्यानंतरच त्या कामाचा स्थायी समिती, सर्वसाधारण सभा असा प्रवास होतो. डक्टचे काम मात्र अशी कोणतीही मंजुरी न घेता तसेच स्थायी समिती व सर्वसाधारण सभा यांनाही अंधारात ठेवून थेट निविदा प्रक्रियेत घेण्यात आले. त्यासाठीच्या निविदाही मागवून घेण्यात आल्या. त्यातही निविदा धारकांना पात्र-अपात्र ठरवण्यावरून बरेच वाद निर्माण झाले. त्यावरून प्रशासनावर जोरदार टीका झाली. या टीकेनंतर हे काम एस्टिमेट कमिटीपुढे मंजुरीसाठी म्हणून आणण्यात आले; मात्र कमिटीने तांत्रिक कारणे दाखवून मंजुरीला नकार दर्शवला.
या कमिटीने त्यात विविध प्रश्न उपस्थित केले होते व कामाबाबतची तांत्रिक माहिती द्यावी, असे नमूद केले होते. कमिटीच्या अहवालात कामातील सर्व त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. तसेच निविदा प्रक्रियेच्या वैधतेबाबतही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. कर्जरोख्यांना मंजुरी घेण्याच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून यावर प्रशासनाला बरेच धारेवर धरण्यात आले. काही सदस्यांनी तर थेट आयुक्तांवर टीका केली. मंजुरी नसताना हे काम घेण्याचे कारणच काय अशी विचारणा करण्यात आली. आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यावलर खुलासा केला; मात्र त्याने सदस्यांचे समाधान झाले नाही.