नेतृत्वावरून काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष
By admin | Published: January 14, 2017 03:42 AM2017-01-14T03:42:12+5:302017-01-14T03:42:12+5:30
कॉँग्रेसमधील वादावादी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरू असून, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी निवासस्थानी
पुणे : कॉँग्रेसमधील वादावादी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरू असून, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी निवासस्थानी बोलावलेल्या कार्ड कमिटीवरून पक्षात खडाजंगी झाल्याची चर्चा
सुरू आहे.
कार्ड कमिटीची बैठक युवक नेत्यांच्या निवासस्थानी कशासाठी, असा मुद्दा उपस्थित करून आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी व पक्षाच्या अन्य काही ज्येष्ठ नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याची माहिती मिळाली. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत असलेल्यांना या बैठकीसाठी निमंत्रणच नव्हते. खुद्द बैठकीत उपस्थित नेत्यांमध्येही राष्ट्रवादीबरोबर आघाडी करावी की करू नये यावरून दोन गट पडले. त्यांच्यातच जोरदार शाब्दिक वादावादी झाली असल्याची चर्चा काँग्रेस भवन परिसरात सुरू आहे.
पक्षातील काही स्थानिक नेत्यांबरोबर झालेल्या प्राथमिक चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठेवलेला जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसची मानहानी करणारा आहे असे सांगितले जाते. त्यानुसार सध्या जिथे नगरसेवक आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील. त्यानंतर ज्या जागा नाहीत त्याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष असेल त्या जागा त्यांना द्यायच्या असा हा प्रस्ताव होता. तसे केले तर काँग्रेसला अर्ध्या जागाही मिळणे अवघड होईल. त्यापेक्षा स्वतंत्र लढून पक्षाच्या जास्त जागा येतील असे आघाडी नको म्हणणाऱ्यांचे मत आहे. तर राष्ट्रवादीची ताकद मान्य करून त्यांच्याबरोबर जावे व त्यांच्या ताकदीचा उपयोग करून जागा वाढवाव्यात असे आघाडी हवी असणाऱ्यांना वाटते. या दोन्ही बाबींवर चर्चा होऊन अखेरीस कशावरच एकमत न झाल्याने हा विषय त्या बैठकीत सोडून देण्यात आला अशी माहिती मिळाली.
पुण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आहे. मात्र, पतंगराव कदम यांच्यामुळे ते लक्ष घालत नाहीत, अशीही चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)