आगम टेकडी बीडीपी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:21 AM2021-02-05T05:21:24+5:302021-02-05T05:21:24+5:30
कात्रज : कात्रजच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस निधी कमी पडू देणार नाही. पुढील काळात कात्रजला महापौर पद देऊ, असे ...
कात्रज : कात्रजच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस निधी कमी पडू देणार नाही. पुढील काळात कात्रजला महापौर पद देऊ, असे आश्वासन हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी दिले. स्थानिक नगरसेविका अमृता बाबर यांच्या निधीतून व आमदार निधीतून होत असलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन चेतन तुपे यांच्या हस्ते पार पडले.
चेतन तुपे यांनी सांगितले, की, पालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे नगरसेविका अमृता बाबर यांना निधी कमी मिळतो. तरी देखील त्यांनी प्रभाग क्रमांक ४० मधील आगम टेकडी परिसरातील पंचम नगर, शनिनगर,अंजली नगर, गुरुनानक नगर, सूर्योदय नगर, सुंधामाता नगर, संतोष नगर या भागातील रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट या सुविधा व अन्य विकासकामे मार्गी लावली.
नमेश बाबर म्हणाले, की अंजलीनगर खाणीच्या जागामालकांना टी.डी.आर देऊन मनपाने या ठिकाणी उद्यान विकसित करावे. पेशवे काळात कात्रजचे पाणी पुण्याला होते. मात्र, आज कात्रजला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नवीन टाक्या कात्रज भागात आहेत. मात्र, आम्हा स्थानिकांनाच पाणी मिळत नाही. तरी स्थानिकासाठी ३० एमएलटी पाणी मिळावे.
अमृता बाबर यांनी सांगितले, की या भागात कामगार, कष्टकरी नागरिक राहतात. त्यांनी एक एक रुपया गोळा करून येथे घरे बांधली आहेत. मात्र, बीडीपी आरक्षण असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर सतत घर पडण्याची टांगती तलवार आहे.
गुरुद्वाराचे बाबाजी, नाना पवार, सागर बाबर, बापू आलगुडे, रमेश जाधव, उदय जाधव, रोहित मोरे, दीपाली पंडीत, संतोषी खाटपे उपस्थित होते.
चौकट
सत्ताधारी भाजप पूर्णपणे अपयशी
राज्यातील सत्तेच्या जोरावर २०१७ मध्ये मनपा निवडणुकीत चारचा प्रभाग व रचनेत हस्तक्षेप करत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपाला २०२२ मध्ये कितीचा प्रभाग होणार? रचना कशी होणार? ? ही चिंता भेडसावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. गेल्या चार वर्षात सत्ताधारी भाजपा पूर्णपणे अपयशी ठरल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असा टोला आमदार चेतन तुपे यांनी लगावला.
फोटो : कात्रज सुंधामातानगर, गुरुनानक नगर येथे विकासकामांचे भूमिपूजन करताना आमदार चेतन तुपे, नमेश बाबर, अमृता बाबर व नागरिक.