आगरकर उपेक्षित समाजसुधारक राहिले : डॉ. राजा दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:07+5:302021-07-15T04:10:07+5:30
पुणे : ज्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप होते, त्या काळात आगरकर सहशिक्षण द्यावे असे म्हणत होते. त्यांचे मोजकेच ...
पुणे : ज्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप होते, त्या काळात आगरकर सहशिक्षण द्यावे असे म्हणत होते. त्यांचे मोजकेच अनुयायी असल्याने आगरकर पंथ निर्माण होऊ शकला नाही. त्या अर्थाने ते उपेक्षित समाजसुधारक राहिले. सुधारकांना अर्धा आगरकरदेखील पचला नाही, हे टिळक यांचे विधान आगरकर यांचे मोठेपणा सांगणारे आहे. ही कादंबरी आगरकरांना वाङ्मयीन न्याय देणारी आहे, असे मत विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी बुधवारी व्यक्त केले.
'सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त 'देशमुख आणि कंपनी'तर्फे प्रकाश पाठक लिखित 'इष्ट तेच बोलणार' या आगरकर यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन डॉ. दीक्षित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 'साधना' चे संपादक विनोद शिरसाठ आणि प्रकाशक विनय हर्डीकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, स्त्री हक्कांचे पुरस्कर्ते एवढीच आपल्याला गोपाळ गणेश आगरकर यांची ओळख आहे. पण, राजकीय सुधारणा, साहित्य, संस्कृती आणि आर्थिक विचार प्रभावीपणे मांडणारे आगरकर हे सर्वांगीण सुधारक होते.
शिरसाठ म्हणाले, चरित्रात्मक कादंबरी लेखकांना काही गोष्टी कल्पनेने भराव्या लागतात. अनेकांना चरित्रात्मक कादंबरी आणि चरित्र यातील फरक समजत नाही. त्यामुळे कादंबरीच्या माध्यमातून इतिहासाकडे पाहिले जाते.
हर्डीकर म्हणाले, इतिहासाकडे बघण्याचा वाचकाचा दृष्टिकोन परिपक्व होईल तेव्हा चरित्रात्मक कादंबरी या प्रकाराला न्याय मिळेल. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.
----------------------