वय अवघे ५, चित्रे काढली ३००; आरुषने काढलेल्या चित्रांचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:02 PM2018-02-26T12:02:50+5:302018-02-26T12:02:50+5:30
अहमदनगरच्या आरुषने वयाच्या दीड वर्षापासून चित्रे काढायला सुरुवात केली. आरुष आता पाच वर्षांचा असून, त्याने आतापर्यंत ३००हून अधिक चित्रे काढली आहेत.
पुणे : सध्याच्या काळात मुले ही कलेपासून दूर जात असून, मोबाईलच्या आहारी गेली असल्याचे चित्र पाहायला मिळते. अहमदनगरच्या आरुषची गोष्ट मात्र निराळीच आहे. वयाच्या दीड वर्षापासून त्याने चित्रे काढायला सुरुवात केली. आरुष आता पाच वर्षांचा असून, त्याने आतापर्यंत ३००हून अधिक चित्रे काढली आहेत. यातील निवडक शंभर चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बालसाहित्यिक ल. म. कडू, लेखक महावीर जोंधळे आदी उपस्थित होते. आरुष गिरमकर दीड वर्षाचा असल्यापासून चित्रे काढू लागला. त्याची आई प्राजक्ता गिरमकर यांनी त्याच्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला साहित्य पुरविले. आरुष हा सर्व प्रकारची चित्रे काढत असला तरी त्याच्या चित्रांमध्ये प्राण्यांच्या चित्रांचे प्रमाण जास्त आहे. प्राजक्ता यांनी आरुषने काढलेली सर्व चित्रे जतन केली. आरुषचे आजोबा रवींद्र सातपुते हे कलेचे शिक्षक आहेत. त्यांनी आरुषची चित्रे पाहिल्यानंतर त्यांचे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला. आरुषच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन अहमदनगरमध्ये भरवण्यात आले. त्यानंतर उदगीर येथील बाल कुमार साहित्य संमेलनातही प्रदर्शन भरवण्यात आले होते.
हे प्रदर्शन भरविण्यामागची कल्पना उलगडून सांगताना रवींद्र सातपुते म्हणाले, मुले ही कलेतून व्यक्त होत असतात. अनेक पालक मुलांच्या कलेला प्रोत्साहन देत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये जागृती व्हावी, त्यांनी त्यांच्या पाल्याला त्याची आवड जोपासण्याची मुभा द्यावी या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्राजक्ता गिरमकर म्हणाल्या, आरुषला त्याला हवी ती चित्रे आम्ही मुक्तपणे काढू दिली. त्याने ठराविक चित्रे काढावीत असा आग्रह कधीही आम्ही धरला नाही. त्यामुळे आरुष त्याला हवी तशी चित्रे काढू लागला. त्याच्या वयाप्रमाणे त्याची समज आणि चित्रे बदलत गेली. हे
प्रदर्शन सोमवारी (दि.२६) देखील असणार आहे.