पोटाच्या मागं धावता धावता शिकायचं वय सरलं
By admin | Published: December 10, 2015 01:28 AM2015-12-10T01:28:39+5:302015-12-10T01:28:39+5:30
पोटाच्या मागे धावता धावता... शिक्षणाचं वय निघून चाललंय... कष्ट करताना जीवाची पर्वा नाही... जादा काम केलं तर जादा मजुरी मिळणार.
माळेगाव : पोटाच्या मागे धावता धावता... शिक्षणाचं वय निघून चाललंय... कष्ट करताना जीवाची पर्वा नाही... जादा काम केलं तर जादा मजुरी मिळणार... मग कष्ट करताना हयगय नाही. उसाच्या ट्रॉलीला कपड्याने बांधून घेऊन अवजड मोळी वर फेकण्याची कसरत करताना ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहत आहेत.
माळेगाव (ता. बारामती) व आसपासच्या परिसरामध्ये ऊसतोड मजूर आणि त्यांची तरुण मुले जीवघेणी कसरत करीत असल्याचे दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अधिकाधिक ऊस भरण्यासाठी जणू त्यांची स्पर्धाच चालल्याचे दिसते. उसाची मोळी घेऊन लाकडी फळीवरून पळत पळत चढणे, पोटाला कापडाने बांधून घेऊन ट्रॉलीला लटकत राहणे, पन्नास-पन्नास किलोची मोळी वीट फेकल्यासारखी फेकणे व झेलणे, पूर्णपणे भरलेल्या ट्रॅक्टरवर बसून प्रवास करणे हे व असे कितीतरी जीवघेणे प्रकार ऊसतोड मजूर करीत असल्याचे दिसत आहे. त्यातच फडावर छोटी मुले कोयता चालवत असल्याचे दृश्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
एकीकडे सरकार बालमजुरीवर आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे ऊसतोड मजूर आपल्या चिमुरड्यांची मदत घेत असल्याचे दिसते. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचावी म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र ऊसतोड मजुरांची मुलं फडावरच का, असा प्रश्नही उभा राहतो.
ही मुलं विहिरी, नदी-नाल्यावर, गर्दीच्या रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. सध्या पाण्यासाठी भटकंती, शिक्षणाचा अभाव, निवाऱ्याची समस्या, औषधपाण्याची समस्या या व अशा कितीतरी
समस्या सध्या प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. (वार्ताहर)