वय हा फक्त एक आकडा! पुण्यातील ज्येष्ठांचा सायकलवर ८ राज्यातून प्रवास, तब्बल ३ हजार किमी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 09:43 AM2024-12-09T09:43:41+5:302024-12-09T09:44:01+5:30
इंडिया गेट पासून सुरु झालेला प्रवास मथुरा, रायपूर, भिलाई, नागपूर अशी अनेक शहरे करत शनिवार वाड्यासमोर संपला
पुणे : दिल्लीतील इंडिया गेटपासून सुरू झालेला हा प्रवास पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्यासमोर संपला. राज्यातील पाच ज्येष्ठ सायकलस्वारांनी आठ राज्यांतून प्रवास करत ३ हजार ४४४ किमीचे अंतर पूर्ण केले आहे. यामध्ये ५३ ते ७९ वयोगटातील सायकलस्वारांचा समावेश होता. यासाठी त्यांना ३० दिवसांचा कालावधी लागला आहे. यंग सिनियर्स ग्रुपच्या सदस्यांनी सहनशक्तीच्या क्रीडा प्रकारांमध्ये "वय हा फक्त एक आकडा आहे" हे दाखवून दिले आहे.
यादरम्यान संघाने दररोज सरासरी ११५ किमीचा प्रवास केला. विशेष म्हणजे कोणतीही सपोर्ट व्हॅन त्यांच्या सोबत नव्हती. दिल्लीतील इंडिया गेटपासून सुरू झालेल्या या प्रवासात, सायकलस्वारांनी आठ राज्यांतून प्रवास केला. यामध्ये मथुरा, प्रयागराज, वाराणसी, बोधगया, दुर्गापूर, कोलकाता, संभलपूर, रायपूर, भिलाई, नागपूर, संभाजीनगर शहरांमधून प्रवास करत शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठिकाणांना भेटी दिल्या. यादरम्यानचे मुख्य आकर्षण होते ते वाराणसीमधील देव दीपावलीचे. यात सहभागी होता आल्याचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही यंग सिनियर्स ग्रुपने सायकल प्रवास पूर्ण केले आहेत. यामध्ये कोलकाता ते कन्याकुमारी ३ हजार किमीचा प्रवास, गुजरात ते अरुणाचल ३ हजार ८७० किमीचा प्रवास आणि काश्मीर ते कन्याकुमारी, असा ३ हजार ९३० किमी प्रवासाचा समावेश आहे. आपला उत्साह दाखवत वरिष्ठ सायकलस्वारांनी तरुण आणि वृद्धांसाठी शाश्वत प्रवासाचा आनंद जनजागृती मोहीम हाती घेतली. यामध्ये गौतम भिंगणिया (वय ७९), मुकुंद चिपळूणकर (वय ७१), संजय कत्ती (वय ६७), शंकर केंगार (वय ६५), मोनीष चक्रवर्ती (वय ५३) या सदस्यांचा समावेश होता.