कार विक्रीप्रकरणात एजंटने लुबाडले साडेतीन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 02:18 AM2018-05-06T02:18:48+5:302018-05-06T02:18:48+5:30
एजंटने मूळ मालकाकडून चारचाकी गाडी घेऊन त्याचा व्यवहार दुसऱ्याबरोबर केला. त्याच्याकडून वेळोवेळी रोखीने, हस्ते-परहस्ते ३ लाख ६५ हजार रुपये अकाउंटवर ट्रान्सफर करून घेऊन, बेअरर चेक घेऊन नर्सरी व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार इनामदारवस्ती, कोरेगावमूळ येथे घडला आहे.
लोणी काळभोर - एजंटने मूळ मालकाकडून चारचाकी गाडी घेऊन त्याचा व्यवहार दुसऱ्याबरोबर केला. त्याच्याकडून वेळोवेळी रोखीने, हस्ते-परहस्ते ३ लाख ६५ हजार रुपये अकाउंटवर ट्रान्सफर करून घेऊन, बेअरर चेक घेऊन नर्सरी व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार इनामदारवस्ती, कोरेगावमूळ येथे घडला आहे. या प्रकरणी संदीप जयसिंग कोतवाल यांनी फिर्याद दिली असून इरफान मजिद शेख या एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोतवाल यांची नर्सरी इनामदारवस्ती, कोरेगावमूळ येथे आहे. त्यांना व्यवसायासाठी गाडीची आवश्यकता असल्याने त्यांनी आपल्या ओळखीचे स्वराज भारत मेमाणे यांच्याशी संवाद साधला होता. यावरून मेमाणे यांनी त्यांना जानेवारी महिन्यात टोयाटो इटियॉस गाडी दाखवली होती. कोतवाल यांना ती आवडली. या वेळी मेमाणे हे, ही गाडी इरफान शेख यांची असून, ते सध्या बाहेर गेले असल्याने ते आल्यावर व्यवहार ठरवू, असे सांगून गाडी घेऊन गेले. १० जानेवारी रोजी मेमाणे व शेख हे दोघे गाडी घेऊन नर्सरीमध्ये आले. शेख यांनी कोतवाल यांना गाडीची कागदपत्रे दाखवली. ती प्रवीण गोपीनाथ पवार यांच्या नावावर होती. याबाबत चौकशी केली असता शेख याने ही गाडी नेक्सा शोरूम, बाणेर येथे एक्स्चेंजसाठी दिली असून तो व्यवहार पूर्ण झाल्यानंंतर तुमच्या नावावर करून देईन, असे सांगितले. गाडीचा व्यवहार ४ लाख रुपयांना ठरला. या वेळी १० हजार रुपये इसार म्हणून देऊन कोतवाल यांनी गाडी ताब्यात घेतली. दुसºया दिवशी शेख आला व ४० हजार रुपये रोख व अवंतिका अवधूत चव्हाण यांच्या नावे ५० हजाराचा बेअरर चेक घेऊन गेला. तो चेक १९ जानेवारी रोजी पास करून घेतला. त्यानंतर २२ जानेवारी रोजी शेख याने फोन करून २ लाख रुपये मेमाणे यांच्या खात्यात टाकण्यास सांगितले. आरटीजीएसद्वारे त्यांनी पैसे भरले. शेख याने पुन्हा २५ जानेवारी पत्नी रेश्मा शेख हिचा सारस्वत बँकेचा अकाउंट नंबर देऊन १ लाख रुपये टाकण्यास सांगितले. कोतवाल यांनी त्याच दिवशी खात्यात एनईएफटीद्वारे ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. याबाबत शेख याने विचारणा केली असता कोतवाल यांनी उर्वरित ५० हजार रुपये व्यवहार पूर्ण झाल्यानंंतर मिळतील, असे सांगितले. फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात शेख याने फोन करून ५० हजार रुपयांची गरज आहे,’ असे सांगिल्याने कोतवाल यांच्याकडे रक्कम नसल्याने त्यांनी त्यांचे उरुळी कांचन येथील मित्र प्रशांत निकम यांना सांगून त्यांच्या मोबाईलवरून १५ हजार रुपये पाठविले. गाडीचे मूळ मालक गोपीनाथ पवार यांचा त्यांना फोन आला, तेव्हा व्यवहारापोटी वेळोवेळी दिलेली ३ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम त्यांना मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे कोतवाल यांच्या लक्षात आले.
दि. ७ मार्च रोजी कोतवाल यांना पुणे येथील पाषाण पोलीस ठाण्यातून आलेल्या फोनवरून आपल्या ताब्यात असलेली टोयाटो इटियॉस गाडी पवार यांची असून त्यांनी अर्ज केला आहे. तुम्ही गाडी घेऊन पोलीस ठाण्यात या, असे सांगण्यात आले. ते तेथे गेल्यानंतर त्यांना मूळ मालकांना गाडीचे पैसे न मिळाल्याने त्यांनी अर्ज केला आहे, असे समजले. काही गैरप्रकार होऊ नये म्हणून त्यांनी गाडी मूळ मालक पवार यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर त्यांनी शेख याला फोन करून हा प्रकार सांगितला. त्या वेळी त्याने, ‘मी तुमचे पैसे परत करतो,’ असे सांगितले; परंतु आजअखेर गाडीचा व्यवहार पूर्ण न करता ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करून पैसे परत केलेले नाहीत म्हणून ४ मे रोजी शेख याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.