थायलंड टूरच्या नावे एजंटांनाच गंडा; कंपनीच्या एकावर गुन्हा
By नम्रता फडणीस | Published: December 7, 2023 06:09 PM2023-12-07T18:09:54+5:302023-12-07T18:11:13+5:30
प्रवाशांसाठी विमानाची तिकिटे आणि व्हिसा न देता साडेतेरा लाखाची केली फसवणूक
पुणे : बँकॉक आणि थायलंड टूरकरिता प्रवाशांसाठी विमानाची तिकिटे आणि व्हिसा देण्याचे आश्वासन देऊन तिकिटे न देता इन्शुरन्स कंपनी आणि एजंटांची १३ लाख ३६ हजार ६६० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ट्रॅव्हल कंपनीच्या एका व्यक्तीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीतील वरिष्ठ झोनल ऑफिसरने फिर्याद दिली. दर्शन ध्रुव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, ट्रॅव्हल कंपनीमार्फत एजंट लोकांकरिता डिसेंबर २०२२ मध्ये बँकॉक आणि थायलंड येथे टूर करिता प्रवाशांची विमानाची तिकिटे व व्हिसा या गोष्टींची पूर्तता करण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. त्याकरिता त्याने फिर्यादी यांच्याकडून ८ लाख ७५ हजार १६० रुपये ऍडव्हान्स रक्कम घेतली.
एजंटच्या नातेवाईकांनाही टूरला घेऊन जातो असे सांगून त्यांच्याकडूनही ४ लाख ६१ हजार ५०० रुपये घेतले. पण त्या बदल्यात कोणतेही तिकीट न देता फिर्यादीच्या कंपनीसह एजंटचे नातेवाईक व मित्रांची असे एकूण १३ लाख ३६ हजार ६६० रुपयांच्या रकमेचा अपहार करीत फसवणूक केली आहे. यात आरोपीने बनावट आरटीजीएस स्लिप, धनादेश बनवून रक्कम दिल्याचे भासवले असे, आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चोरमले करीत आहेत.