पोलिसांच्या नावाने एजंटगिरी करणाऱ्यांनी घातला २० लाखांना गंडा
By विवेक भुसे | Published: January 4, 2024 07:59 PM2024-01-04T19:59:37+5:302024-01-04T19:59:47+5:30
मानवाधिकार कार्यकर्त्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : आर्थिक गुन्ह्यात अटक होऊ नये, म्हणून मध्यस्थी करुन पोलिसांना देण्यासाठी २० लाख रुपये घेऊन एका व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यासह दोघांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईक्बाल ईब्राहिम शेख (रा. नईम सोसायटी, कौसरबाग, कोंढवा) आणि साजीद बासीत शेख (रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत एका ४१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पतीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल होता. त्यात ईक्बाल शेख हा मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्यांच्या पतीवर कारवाई होऊ नये, म्हणून शेखने ९ लाख रुपये घेतले हेाते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्याने फिर्यादींच्या पतीला फोन करुन तुम्हाला पोलिस कधीही अटक करु शकतात, असे सांगितले व उरलेले १ लाख रुपये मागितले. तेव्हा त्यांनी चार दिवसात पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर शेख वेळोवेळी गुन्हा दाखल होण्याची भिती दाखवून पोलिसांना पैसे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळत होता. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी फिर्यादींच्या पतीला पोलिस घेऊन गेले. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर तो वेळोवेळी त्यांना जामीन करुन देतो, असे सांगत होता. फिर्यादींच्या पतीला अटक झाल्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा शेख याने साजीद शेख मार्फत फिर्यादी यांना चार लाख रुपये परत देत असल्याचे भासविले. परंतु, प्रत्यक्ष पैसे परत केले नाही. दरम्यान एप्रिल २०२३ मध्ये फिर्यादी यांच्या पतीला जामीन मिळाला. फिर्यादी यांनी ईक्बाल शेख याच्याकडे दिलेले २० लाख रुपये परत मागितले. तेव्हा त्याने शिवीगाळ करुन धमक्या दिल्या. फिर्यादी यांनी त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड केले होते. फिर्यादी यांनी ईक्बाल शेख याचा शोध घेऊन त्याच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी काही महिला व पुरुषांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. तेथे ईक्बाल शेख याने १५ ते २० दिवसात पैसे परत करणार असल्याचे सांगितले. तरीही त्याने अद्याप पैसे न दिल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक संदीप भोसले तपास करीत आहेत.