‘अग्नीपथ’ साठी बनावट डोमिसाईल काढून देणार्या एजंटांना अटक
By विवेक भुसे | Published: October 3, 2022 11:10 AM2022-10-03T11:10:36+5:302022-10-03T11:10:47+5:30
मुंबई परिसरात राहत असल्याचे ४० बनावट डोमिसाईल काढून देणार्या दोघांना अटक
पुणे : केंद्र सरकारच्या सरंक्षण विभागाच्या अग्नीपथ योजनेत सैन्य भरतीसाठी मुंबई परिसरात राहत असल्याचे बनावट डोमिसाईल काढून देणार्या दोघा एजंटांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पोपट विठ्ठल आलंदार (वय ३८) आणि सुरेश पितांबर खरात (वय ३१, दोघेही रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के, कोरे शाळा सोडल्याचे दाखले, डोमिसाईल प्रमाणपत्र, रोख रक्कम, इतर दस्त, मोबाईल, कार असा ४ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी सांगितले की, मुंबई पुणे बंगलोर महामार्गात वडगाव येथील दांगट पाटील एम्पायर समोर दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मिळालेले बनावट रबरी शिक्के, कोरे शाळा सोडल्याचे दाखले यांची पोलिसांनी चौकशी केली. केंद्र शासनाच्या आर्मी भरतीसाठी सध्या मुंबईत अग्नीपथ भरती सुरु आहे. त्यात जी डी (जनरल ड्युटी) आणि टेक्नीकल अशा दोन पदांसाठी भरती होत आहे़ त्यात फक्त मुंबई, ठाणे, पालघर येथील रहिवासी अर्ज करु शकतात. त्यांची जाहिरात आल्यानंतर काही उमेदवारांनी अॅकेडमीकडे संपर्क साधला. त्यांनी या एजंटांमार्फत या उमेदवारांच्या बनावट शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुरावा तयार करण्यासाठी बनावट भाडे करार तयार केले. सरपंचाचा दाखला घेऊन सेतू मार्फत या जिल्ह्यांमध्ये रहात असल्याचे डोमिसाईल सटिर्फिकेट तयार करुन घेतले. अशा ३० ते ४० परिक्षार्थीचे डोमिसाईल या एजंटांनी तयार करुन घेतल्याचे आता पर्यंतच्या तपासात समोर आले आहे.