पुणे विद्यापीठात ABVP चे आक्रमक आंदोलन; तोडफोड करत कुलगुरुंच्या अंगावरती निवेदन फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 01:14 PM2023-04-24T13:14:54+5:302023-04-24T13:18:44+5:30
पुणे विद्यापीठात ABVP चे आक्रमक आंदोलन...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. अखिल भारतीय विद्यार्थ्यांनी मुख्य सभेत जाऊन आंदोलन करत तोडफोड केली व निवेदन कुलगुरू यांच्या अंगावरती भिरकवली.
विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल मिटिंगमध्ये हे विद्यार्थी घुसले. त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या समोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या आम्ही ऐकून घेतल्या आहेत. त्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती कुलगुरू कारभारी काळे यांनी यावेळी दिली. आम्ही कुठलीही तोडफोड केली नाही यापूर्वी आम्ही विद्यापीठात कुलगुरूंना निवेदनही दिलं होतं. विद्यापीठात प्रत्येक गोष्टीला परवानगी घ्यावी लागते मात्र रॅप साँगला परवानगी दिली कोणी, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
ABVP च्या मागण्या-
- विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँगचे शुटिंग झाले कसे याची चौकशी व्हावी.
- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा व डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रवेश प्रलंबित आहे ते लवकरात लवकर देण्यात यावे.
- परीक्षांचे प्रलंबित निकाल व लागलेल्या निकालांमध्ये चुका झालेल्या आहेत. त्या दुरूस्त कराव्यात.
- स्पोर्ट स्टेडियमचे उद्घाटन होऊन देखील विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी आहे त्यावर योग्य निर्णय घ्यावा.
- BScBEd च्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा १००% लाभ न देण्यात याव्यात या मागण्या यावेळी केल्या.
पुणे विद्यापीठात ABVP चे आक्रमक आंदोलन; तोडफोड करत कुलगुरुंच्या अंगावरती निवेदन फेकले#pune#abvppic.twitter.com/F5fiHWPNk0
— Lokmat (@lokmat) April 24, 2023
विद्यापीठात रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी शुभम आनंद जाधव (वय २४, रा. जयभवानीनगर, पाषाण) याच्याविराेधात चतु:श्रृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुधीर दळवी (वय ५०) यांनी फिर्याद दिली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची काेणतीही लेखी परवानगी न घेता हे गाणे चित्रित केल्याचे समोर आले आहे.
त्यांनी अनधिकृतपणे मुख्य इमारतीच्या संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती हाॅलमध्ये प्रवेश केला. हेरिटेज बिल्डिंग वर्ग १ मध्ये तलवार, पिस्तुलाचा वापर करीत अश्लील शब्दांचा वापर सार्वजनिक ठिकाणी करत चित्रीकरण केले आणि चित्रफीत प्रसारित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
तरुणांनी सुरक्षा यंत्रणा भेदली कशी?
विद्यापीठ प्रशासनाची चित्रीकरणासाठी परवानगी नसताना तरुणांनी या ऐतिहासिक वास्तूमध्ये सुरक्षा यंत्रणा भेदून चित्रीकरण केलेच कसे? याप्रकरणी सुरक्षा विभागातील दाेषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.