'कर्मयोगी' समोर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; थकीत रक्कम न दिल्याने आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:34 PM2021-11-02T19:34:12+5:302021-11-02T19:34:19+5:30
कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
कळस : इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या हंगामातील ऊस बिलाची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत काटा बंद आंदोलन केले. बिलांची रक्कम दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला. मात्र कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
इंदापूर, कर्जत, माढा, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. काही शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत काटा बंद केला. ऊसाचे पहिले बिल तसेच एफआरपी न दिल्याने आंदोलन करण्यात आले. मागणी अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर निर्णय झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.
काही शेतकऱ्यांना उसाच्या रकमेचे चेक देण्यात आले होते. मात्र रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम कारखान्याचा गाळपाचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक झाला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठी पैसे नसल्याचे सांगितले.
त्यामुळे नुकत्याच कारखान्याच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. कारखान्याने एफआरपीची उर्वरित रक्कम तसेच पहिल्या हप्ताची राहिलेली रक्कम दिवाळीपूर्वी सोडणे गरजेचे होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे विलंब झाल्याने शेतकर्यांनी सहनशीलता संपल्याने उद्रेक झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी कारखाना प्रशासन व आंदोलक यांची बैठक घेऊन चर्चा केली. अखेर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असून कारखान्यांनी थकित उसाचे देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन कार्यकारी संचालक यांनी दिले आहे.