पीडित प्राध्यापकांनी न्यायाधिकरणाकडे मागावी दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:18+5:302021-09-22T04:12:18+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी आपल्यावरील अन्यायासंदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडे तक्रार न करता विद्यापीठ व ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी आपल्यावरील अन्यायासंदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडे तक्रार न करता विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाकडे किंवा तक्रार निवारण समितीकडे दाद मागावी, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून काढून टाकले जात असल्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यात प्रामुख्याने व्यवस्थापनाकडून बडतर्फ करणे, पदावरून काढून टाकणे, सेवा समाप्त करणे किंवा सक्तीने सेवानिवृत्त करणे आदी प्रकरणांचा समावेश आहे.
व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाबाबत विद्यापीठाच्या विभागाकडे मोठ्या प्रमाणावर लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या जात आहेत. तसेच यावर माहिती अधिकारात अर्ज केले जात आहेत. यासंदर्भातील प्रकरणांची संख्या मोठी असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे संबंधित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे किंवा तक्रार निवारण समितीकडे आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.