धक्कादायक! स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी कृत्य; २ तृतीयपंथीयांना रंगेहाथ पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 10:31 AM2022-12-24T10:31:20+5:302022-12-24T10:31:33+5:30
शुक्रवारी वैकुंठ स्मशानभूमीत रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने शिंदे आणि धुमाळ हे चितेजवळ आले.
किरण शिंदे
पुणे - शहरातील डेक्कन येथील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणा सारखे अघोरी कृत्य करतानाची घटना समोर आल्यानं खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ तृतीयपंथींना अटक केली आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शुक्रवारी वैकुंठ स्मशानभूमीत रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने शिंदे आणि धुमाळ हे चितेजवळ आले. दोघांनी त्यांच्यासोबत आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी अघोरी कृत्य करत होते. ही घटना स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने पाहिली आणि त्याने पोलिसांना कळवलं. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी या दोघांनाही रंगेहाथ पकडले.
पोलीस सध्या या घटनेची चौकशी करत असून दोन्ही आरोपींविरोधात नरबळी व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.