Pune: पुण्यात राज्यपालांविरोधात केले आंदोलन; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर ८ दिवसांनी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 03:45 PM2022-03-09T15:45:31+5:302022-03-09T15:45:44+5:30
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी न घेता २८ फेब्रुवारी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते
पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी न घेता २८ फेब्रुवारी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी असून त्यांच्याकडेच गृह खाते आहे. नेमकी कोणी फिर्याद द्यावी, याबाबत संभ्रम होता. या आंदोलनाची फिर्यादी महापालिकेने द्यायची की पोलिसांनी यावर तब्बल ८ दिवस काथ्याकुट केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना आंदोलन केल्याबद्दल इतक्या उशिरा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असावी.
यानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, महेश हांडे, दीपाली धुमाळ, मृणाली वाणी, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, विक्रम जाधव, बाळासाहेब बोडके, योगेश ससाणे, सुनिल बनकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० महिला, पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही प्रकारची पोलीस विभागाची व इतर विभागाची पूर्व परवानगी न घेता़ पुणे मनपा कार्यालयात त्यांना आत जाण्यास रोखले असताना त्यांनी न ऐकता गैरकायद्याची मंडळी जमविली. मनपाचे जुन्या इमारतीच्या पायर्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करुन आंदोलन केले, म्हणून सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद एका पोलीस शिपायाने दिली आहे.
पुणे मनपा ही वास्तू पुणे मनपाच्या अखत्यारित असल्यामुळे पुणे मनपा कार्यालयातील संबंधीत अधिकार्यांनी तक्रार द्यावी की पोलीस विभागाने तक्रार द्यावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. महापालिका अधिकार्यांनी तक्रार देणे अपेक्षित होते. त्यांनी तक्रार न दिल्याने शेवटी सर्व गोष्टींची शहानिशा करुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.