मेट्राेच्या विराेधात कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांचे आंदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 08:40 PM2019-07-17T20:40:03+5:302019-07-17T20:40:47+5:30
शिवाजीनगर येथे हाेणाऱ्या मेट्राेमुळे कामगार पुतळा वसाहत बाधीत हाेणार आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी रहिवाश्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली.
पुणे : शिवाजीनगर येथे हाेणाऱ्या मेट्राेमुळे कामगार पुतळा वसाहत बाधीत हाेणार आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी रहिवाश्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. कामगार पुतळा झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात झोपडीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कामगार पुतळा झोपडपट्टी ही अधिकृत झोपडपट्टी म्हणून यापुर्वीच घोषित करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्तावही मंजूर आहे. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेंगाळला आहे. दरम्यान, झोपडपट्टीतून मेट्रो मार्ग जात आहे. झोपडीधारकांचे पुनर्वसन जागीच होणार की नाही याबाबत महामेट्रो, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही दाद दिली जात नाही. गेल्या बारा वर्षांपासून विकास होणार या आशेवर येथील नागरीकांना अत्यंत वाईट परिस्थितीत रहावे लागत आहे. मेट्रोमार्गासाठी आवश्यक जागा देऊनही जाऊनही शिल्लक राहते. त्याठिकाणी पुनर्वसन होणे सहज शक्य आहे. मात्र, संपूर्ण झोपडपट्टीच हलविण्याचा डाव सुरू आहे. याविरोधात ही निदर्शने करण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
आंदोलनावेळी मेट्रो मार्ग नदीपात्रातून काढावा किंवा पिलरपुरती जागा घ्यावी व शिल्लक जागेत पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आले. मेट्रोला विरोध नाही मात्र विकास होत असताना झोपड्यांचा ही जागेवरच विकास करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.