'भाजपची पोपट कंगना रणौतचा धिक्कार असो', पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:52 PM2021-11-12T12:52:29+5:302021-11-12T12:55:30+5:30
कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली
पुणे: कंगना रणौत च करायचं काय, खाली डोकं वर पाय, भाजपची पोपट कंगना रणौत करायचं काय, कंगना राणावत माफी मागो, कंगना रणौतचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने कंगनाने केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ''वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतच्या स्टेटमेंटचा राष्ट्रवादी काँग्रेसपुणे शहर निषेध करत आहे. या स्टेटमेंट ला अमित शाह आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांना एकूणच देशाच्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास झाकायचा आहे. त्याचबरोबर एक मनुवादीवृत्ती पुढे आणायची आहे. त्यासाठी कंगना रणौतला पुढे ठेवून अशी पेरणी केली जात असल्याचा आमचा आरोप आहे. कंगना रणौत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.''
‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असे आक्षेपार्ह विधान कंगनाने एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून कंगना टीकेची धनी ठरली असून, तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले.
भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी
''कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.''