पुण्यातील व्यापाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन एक दिवसासाठी स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:27 AM2021-04-12T11:27:28+5:302021-04-12T11:29:13+5:30
लाॅकडाऊनला कडाडून विरोध करत आज व्यापारी दुकाने सुरू ठेवण्यावर होते ठाम
पुणे: पुण्यात लादलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ पुण्यातील व्यापाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन एक दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे. काल प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचाच निषेध करत पुण्यातील व्यापारी महासंघाने शुक्रवार पासुन आंदोलन पुकारले होते. शुक्रवारी मानवी साखळी तर आज दुकाने उघडून निषेध करण्यात येणार होता. एक दिवस मुख्यमंत्र्यांना निर्णयासाठी वेळ द्यावा म्हणून त्यांनी सोमवारपासून दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले होते.
शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पुणे व्यापारी महासंघ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनाची विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, यासह सचिव महेंद्र पितळिया महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल दोन-अडीच तास चालेल्या बैठकी प्रशासनाने गंभीर परिस्थितीची जाणीव व्यापा-यांना करून दिली. परंतु गेल्या वर्षी तोट्यात गेलेला व्यापार आता सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊन लागले. व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढतो, अशी ओरड केली जाते; पण शहरात अनेक कारखाने, पेट्रोलपंप, रिक्षा, खाद्यपदार्थ, स्टॉल्सवर गर्दी आहे. नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने लादायला हवीत, त्यांना बंधने न घालता केवळ व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे. एप्रिल, मे महिन्यांत रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुढीपाडवा, अक्षयतृतीया यांसारखे महत्त्वाचे सण आहेत. यामुळे बैठकीत व्यापा-यांनी लाॅकडाऊनला कडाडून विरोध करत सोमवारी दुकाने सुरू ठेवण्यावर ठाम होते.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत व्यापारी महासंघाची राज्याची बैठक सुरू होती. त्यानंतर व्यापाऱ्यांची रात्री उशीरा पर्यंत आपापसात चर्चा देखील झाली. अखेर हे आंदोलन एक दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.