आंदोलन सुरूच; शेतकरी संभ्रमात
By admin | Published: June 4, 2017 05:21 AM2017-06-04T05:21:22+5:302017-06-04T05:21:22+5:30
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मिटला, असे वृत्त पाहिल्यानंतर बारामती शहरातील किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्यांनी सकाळीच गणेश मंडईत माल
- लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मिटला, असे वृत्त पाहिल्यानंतर बारामती शहरातील किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्यांनी सकाळीच गणेश मंडईत माल आणण्यास सुरूवात केली. दुपारी नंतर ग्राहकांची देखील वर्दळ सुरू झाली. हातावरचे पोट असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील शेतीमाल विक्रीला आणला होता. मंडईतील व्यवहार सुरळीत सुरू झालेले असताना दुपारी शेतकऱ्यांसह आलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी मंडई बंद ठेवा, असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, विक्रेत्यांना त्यांना जुमानले नाही. माल आणला आहे, आता नुकसान होईल. सोमवारच्या बंद मध्ये आम्ही सहभागी होवू असे सांगितले. तरी देखील भाजी विक्रेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता.
सोमवारी बारामती बंद..
संप मिटला असे सांगितले जात असले तरी सोमवारी बारामती बंदचे आवाहन केले. या मध्ये व्यापारी, शेतकरी, विक्रत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले नाही.
संपाबाबत दिवसभर विविध चर्चा
दरम्यान, बारामती इंदापूरात संप मिटल्याच्या बाबत संभ्रमावस्था होती. स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. त्यामुळे शेतकऱ्यांचा संप मागे घेतल्या बाबत संभ्रमावस्था होती. काही शेतकऱ्यांनी संप लवकर मिटावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
दौंडला व्यवहार पूर्ववत
दौंड : तालुक्यातील काही गावे वगळता शेतकऱ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी थंडावले आहे. पाटस येथील व्यापारपेठ काहीकाळ बंद होती. तर बोरीबेल (ता.दौंड) येथील आठवड्याचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. तर दूध संकलन बंद होते. तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये शेतकऱ्यांचे व्यवहार सुरळीत होते. पाटस, बोरीबेल ही दोन गावे वगळत शेतकऱ्यांनी आपआपले व्यवहार सुरळीत ठेवले होते.
सासवडला बंद
सासवड : संपूर्ण राज्यात सध्या दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांना पिण्यास पाणी नाही, ठिकठिकाणी जनावरांना चारा नाही. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होत नाही. याच्या निषेधार्थ सासवडला किरकोळ भाजी विक्रेते व व्यापारी असोसिएशनच्या वतीने एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापा-यांनीही याला पाठिंबा दिल्याने सासवड मधील सर्व दुकाने आज बंद होती. त्यामुळे व्यवहार झाले नाहीत.
भोरला शेतकऱ्यांचा संप सुरूच
काही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतले असले तरी किकवी येथे शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर ठाम राहून शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी अधिक आक्रमक भूमिका घेऊन या भागातील भाजीपाला, दूध पुणे मुंबईकडे जाऊ दिले नाही. त्यामुळे
पुणे सातारा महामार्गावर दूध व भाजीपाला असणाऱ्या
गाड्यांची कोंडी झाली.
शिरूरला दूध संकलन बंद
‘संप मिटला’ सरकारने ‘संपात फूट पाडली’ अशा आशयाच्या पोस्ट दिवसभर सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने आज शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संप मिटल्याच्या बातमीने आज शेतकरी शिरूरच्या आठवडे बाजारासाठी भाजीपाला, तरकारी घेऊन आले. सकाळी शिवसेनेने त्यांना रोखले. मात्र तासाभरानंतर दिवसभर आठवडेबाजार गजबजलेला दिसला. ग्रामीण भागात मात्र आजही दूध संकलन झाले नाही. पूर्व भागात भाजीपाला तरकारीची शहरात जावक झाली नाही.
चाकणला सर्वपक्षीय आंदोलन
चाकण : शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कांदे, बटाटे, दूध ओतून शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. ३) सकाळी अकरा वाजता पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास चाकण येथील माणिक चौकात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारविरोधात निषेध नोंदविला. शेतकरी व दूध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यशासनाला सद्बुद्धी यावी, अशी प्रार्थना करीत आणि शेतमालासह दुधाला प्रतिलिटरला पन्नास रुपयांचा हमीभाव मिळाला पाहिजे, अशी जोरदार मागणी करीत शेकडो लिटर दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून देण्यात आले.
इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी संप सुरूच ठेवण्यास आंदोलन ठाम होेते. बोरी (इंदापूर) येथिल शेतकरी संपावर आजही ठाम आहे. शनिवारी सकाळी श्रीराम चौक बोरी येथे दुधाच्या किटल्या वभाजीपाला टाकून सरकारचा निषेध केला शेतकऱ्यांनी स्वताकडे असलेला भाजीपाला व दूध विकणार नाही असा निर्णय घेतला आहे. गावातील दूध संकलन केंद्र ही बंद आहेत. गावातील सर्व शेतकऱ्यानी या संपाला प्रतीसाद दिला आहे. भीगवण, डाळज परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बैलगाडी, बैलासह पुणे सोलापूर महामार्ग अर्धा तास रोखला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वहानांच्या रांगा लागल्या होत्या. इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील शेतकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग घेतला आहे. शेतातील भाजीपाला, शेकडो क्विंटल टोमॅटो रस्त्यावर आज फेकून दिला आहे. पुणे मुंबईच्या व्यापाऱ्याने खरेदी केलेला टोमॅटो शेतकऱ्यांच्या संपामुळे जागेवर सडून जात आहे. परिणामी शेकडो टन टोमॅटो जनावरांचा चारा झालेले चित्र तालुक्याच्या पश्चिमेकडील भागांत दिसून येत आहे.
पुणे-शिरूर महामार्गावर पुतळा जाळला
पेठ: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या गाड्या अडवून रास्ता रोको केला. या वेळी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. काहींनी आंदोलन मागे घेतले असले तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
असल्याचे सातगाव पठार शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. पुणे-नाशिक महामार्गावर सकाळी ९ ते १० या वेळेत सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी संप करून सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत आपला निषेध नोंदविला.