आरक्षणाला पुण्यातून चांगलाच पाठिंबा; शहरात बंद, उपोषण, मोर्चा याबरोबरच कँडल मार्च
By श्रीकिशन काळे | Published: October 31, 2023 01:51 PM2023-10-31T13:51:43+5:302023-10-31T13:56:33+5:30
एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली...
पुणे :मराठा आरक्षणाला पुण्यात चांगला पाठिंबा मिळत असून, आज नवले ब्रीजजवळ महामार्गावर टायर जाळण्यात आला. त्यामुळे तिथे काही तणावाचे वातावरण होते. तिथे एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच शहरात बावधनमध्ये बंद पुकारण्यात आला असून, ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी उपोषण केले जात असून, कँडल मार्च देखील काढले जात आहेत. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याने त्यावर जरांगे पाटील यांनी सर्वांनी शांत राहावे असे आवाहन केले आहे. जांभुळवाडी गावामध्ये देखील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातही साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा व लाक्षणिक उपोषण आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे चौक, कोंढवा खुर्द येथे हे उपोषण होत आहे. दि मुस्लिम फांउडेशन, कोंढवा खुर्द, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आणि माजी नगरसेवक ॲड. हाजी गफुर पठाण यांनी हे उपोषण सुरू केले आहे.
शिवणे परिसरात आज मशाल मोर्चा
सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मशाल मोर्चा आयोजिल आहे. हा मोर्चा अहिरे गेट ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, न्यू कोपरे येथून सुरू होईल.
आज कर्वेनगरात कँडल मार्च
सकल मराठा समाज, कर्वेनगरच्या वतीने आज मंगळवारी (दि.३१) सायंकाळी ५.३० वाजता कँडल मार्च काढण्यात येणार आहे. हा मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (वारजे) कॅनॉल रोड मार्गे विकास चौक-मावळे आळी चौक(मुख्य रस्ता)मार्ग विठ्ठल मंदिर राजाराम पुलाजवळ समाप्त होईल.
मंडई बंद ठेवणार
महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी बुधवारी (दि.१) संपूर्णपणे बंद पुकारला आहे. तशा आशयाचा फलक सोमवारपासूनच मंडईमध्ये लावण्यात आला होता, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही.
वकिलांचा उद्या मशाल मोर्चा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील वकिलांनी भव्य मशाल मोर्चा आयोजिला आहे. हा मोर्चा १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (एसएसपीएमएस कॉलेज) येथून सुरू होणार आहे. शिवाजी पुतळा ते महाराणी जिजाऊ पुतळा लाल महाल येथपर्यंत हा मोर्चा असणार आहे.