पुण्यात बालभारतीच्या गेटवर २०० ते २५० कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: July 12, 2022 04:35 PM2022-07-12T16:35:59+5:302022-07-12T16:36:11+5:30
कामावर परत घ्यावे व जून महिन्याचा पगार मिळावा या प्रमुख मागण्या
पुणे : बालभारती येथे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून काम करणा-या कंत्राटी कामगारांना जूनच्या अखेरीस त्यांचे कंत्राट संपल्यानंतर कामावर बाेलावले गेले नाही. तसेच त्यांचा जून महिन्याचा पगारही झालेला नाही. कामावर परत घ्यावे व जून महिन्याचा पगार मिळावा या मागणीसाठी मंगळवारी दुपारी बालभारतीच्या गेटवर जवळपास २०० ते २५० कामगार जमले हाेते.
सेनापती बापट राेडवरील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या बालभारतीचे कार्यालय आहे. येथे हाउसकिपींगपासून क्लार्क, सेवक, डीटीपी ऑपरेटर, लघूलेखक ते इंजिनिअर असे जवळपास तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी काम करतात. त्यापैकी काही दाेन वर्षांपासून तर काही दहा ते बारा वर्षांपासून काम करतात. हे सर्व कंत्राटी तत्वावर आहेत. त्यांचा कामाचे ठिकाण हे बालभारतीमधील अकाउंट, वितरण अशा विविध विभागात आहे.
येथे उपस्थित असलेल्या कर्मचा-यांनी माहीती दिली की त्यांना ३१ तारखेला बालभारती प्रशासनाने पुढील तीन ते चार दिवस ब्रेक दिला असल्याचे सांगितले. तसेच त्यांना नवीन कंत्राटमध्ये सामावून घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, आज १२ दिवस झाले तरी त्यांना परत कामावरही बाेलावले नाही आणि पगारही दिला नाही. तसेच त्याबाबत काही माहीतीही दिली जात नाही. तसेच प्रशासनाने काेणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढून टाकल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.