कामावरुन कमी केल्याने राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील कंत्राटी सुरक्षारक्षकांत असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:28 PM2017-10-03T13:28:07+5:302017-10-03T13:52:35+5:30
कामावरून अचानक कमी करण्यात आल्यामुळे संतापलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न मंगळवारी सकाळी केला.
पुणे : कामावरून अचानक कमी करण्यात आल्यामुळे संतापलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न मंगळवारी सकाळी केला. मात्र त्यांची सेवा सुरक्षा विभागाने खंडित केली आहे, असे सांगितल्यावर ते निघून गेले. महापालिकेने कंत्राटी स्वरूपातील एकूण ९०० सुरक्षा रक्षकांची कपात केली असून त्यामुळे असंतोष पसरू लागला आहे. काही ठेकेदारांकडून त्यांना फूस लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकातच सुरक्षा रक्षकांसाठीची तरतूद कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने अचानक ९०० सुरक्षा रक्षकांची कपात केली. अनेक ठेकेदार कंपन्यांनी नगरसेवक किंवा पदाधिकाºयांच्या माध्यमातून सुरक्षारक्षक पुरवण्याचा ठेका मिळवला होता. त्यांना महापालिकेच्या विविध आस्थापनांवर नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. त्यांची गरज नाही, असे लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने ही कपात केली आहे.
मात्र त्यामुळे आता कामावरून कमी झालेले सुरक्षारक्षक ठेकेदारांच्या विरोधात भांडण्याऐवजी महापालिकेला जाब विचारू लागले आहेत. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात एकूण ४२ सुरक्षा रक्षक होते. त्यापैकी केवळ १५ जण कायम ठेवण्यात आले असून उर्वरित सुरक्षा रक्षकांचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी संग्रहालयाचे प्रमुख संचालक डॉ. राजकुमार चौधरी यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी हा सुरक्षा विभागाचा निर्णय असून त्यांच्याकडे विचारणा करायला हवी असे स्पष्ट केले. यावेळी काहीजणांनी शाब्दिक वाद घालण्याचा प्रयत्न केला.
त्यावरून संग्रहालयात सुरक्षा रक्षकांनी तोडफोड केली अशी चर्चा सुरू झाली. डॉ. चौधरी यांनी तसे काहीही नसल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षक कमी करण्याचा निर्णय सर्वस्वी प्रशासनाचा आहे, त्यामुळे त्याबाबत आपण काहीच बोलू शकत नाही असे ते म्हणाले. आमच्याकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले.