पुण्यात सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:32 AM2018-05-08T03:32:14+5:302018-05-08T03:32:14+5:30
बोपोडी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सोमवारी साडेचार वाजता आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर प्रभागातील अनेक नागरिकांना घेऊन आंदोलन केले. विकासकामात घरे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करताना प्रशासन त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुणे : बोपोडी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सोमवारी साडेचार वाजता आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर प्रभागातील अनेक नागरिकांना घेऊन आंदोलन केले. विकासकामात घरे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करताना प्रशासन त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी त्यांना यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
बोपोडी येथे हॅरिस पुलानजीक रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात तेथील सुमारे २३३ घरे बाधित होत आहेत. त्यांना देण्यासाठी याच परिसरात महापालिकेच्या मालकीच्या १६६ सदनिका आहेत, वेगवेगळ्या योजनांखाली त्या पालिकेकडे आल्या आहेत. तिथे प्राधान्याने या सर्वांचे पुनर्वसन करणे शक्य असताना प्रशासन मात्र या बाधितांना हडपसर व बाहेरच्या परिसरात पाठवत आहे.
न्यायालयाचा आदेश, आयुक्तांचा आदेश डावलून क्षेत्रीय कार्यालयाने सर्व बाधितांच्या हडपसर येथील घरांसाठी सोडती काढल्या, असे नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले. सर्वाचे व्यवसाय, नोकरी बोपोडीत असताना त्यांच्यावर हडपसर येथे जाण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे, त्याविरोधात आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत हे सर्व नागरिकही उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी मुसळे यांना बोलावणे पाठवले. त्या वेळी हे सर्व नागरिक तसेच क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम, मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी अनिल मुसळे आदी उपस्थित होते. मुसळे यांनी त्यांना सर्व स्थिती सांगितले. तेली-उगले यांनी त्यांना यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले व कोणत्याही बाधितावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.