'कोरोना योद्धे' म्हणून गौरविलेले डॉक्टर,परिचारिकांकडे वाढते दुर्लक्ष; पुण्यात ससूनच्या परिचारिकांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 10:54 AM2020-08-20T10:54:16+5:302020-08-20T12:23:51+5:30
‘नव्याचे नऊ दिवस’ म्हण केली प्रशासनाने सार्थ
पुणे : मराठीत ‘नव्याचे नऊ दिवस’ अशी एक म्हण आहे़ कोणत्याही गोष्टीचे नऊ दिवस कौतुक असते, त्यानंतर त्यांच्याविषयी लोकांचा रस संपून जातो अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते़ अशीच काहीशी परिस्थिती कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी डॉक्टर व परिचारिकांची अवस्था शासनाने केली आहे.
कोरोनाचा ससंर्ग वाढू लागला, तसा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका यांचा कोरोना युद्धा म्हणून गौरव केला गेला. त्यांच्यावर फुले उधळण्यात आली. सतत संसर्ग होण्याचा धोका असलेल्या या लोकांकडून समाजात व त्यांच्या कुटुंबाला संसर्ग होऊ नये, म्हणून त्यांची हॉटेल, विश्रामगृहात सुरुवातील चांगली सोय केली. मात्र, जेव्हा या हॉटेलची बिल देण्याची वेळ आली. तेव्हा प्रशासनाचा सर्व आदरभाव गळून पडला. त्यातूनच हे डॉक्टर, परिचारिकांकडे दुर्लक्ष होऊ लागले.
नव्याचे नऊ दिवस संपल्यावर सर्वांकडूनच या लोकांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होत गेला आहे. आता तर शासनाने परिचारिकांचा विलगीकरणाचे दिवस ७ वरुन ३ वर आणले आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात असल्यानंतर संबंधितांना ७ दिवसांनंतर लक्षणे दिसून येतात, या निकषाने या परिचारिकांना रुग्ण सेवा देत असताना चुकून संसर्ग झाला असेल तर तो इतरांपर्यंत पसरु नये म्हणून त्यांना ७ दिवसांच्या ड्युटीनंतर ७ दिवस विलगीकरणात राहण्याची तरतुद होती. आता ती ३ दिवसांवर आणली असून तेही त्यांनी घरी राहावे, असे आदेश काढले आहे.
याबाबत काही परिचारिकांनी सांगितले की, घरी विलगीकरणात राहणे शक्य नाही. त्यातून घरात संसर्ग पसरण्याचा धोका आहे.
हॉटेलमध्येही आता त्यांच्याकडे पूर्वीसारखे लक्ष दिले जात नाही. सुरुवातीच्या काळात हॉटेलमध्ये देण्यात येणारे जेवण हे चांगले व पौषिकच असेल, याकडे अधिकारी जातीने लक्ष देत. डॉक्टर, परिचारिकांना आपण सेवा देऊन आपण देशसेवेला हातभार लावत असल्याची हॉटेलचालक, वेटर यांची भावना होती. पण, गेल्या काही दिवसात त्यांच्याही वर्तनात या परिचारिकांना फरक जाणवू लागला आहे. आता प्रशासनाचे जेवणाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. कोविड सेंटरमधील जेवणाचा दर्जाही खालावला आहे.
हॉटेलमधील कर्मचारीही आता त्यांच्या सोयी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करु लागले आहेत. त्यामुळे आता डॉक्टर, परिचारिका आपल्याला लागणारे खाद्यपदार्थ घरुन मागून घेऊ लागले आहेत. आता तर प्रशासनाने त्यांनी घरातच विलगीकरणात रहावे, असे आदेश काढले आहेत. नव्याचे नऊ दिवस ही म्हण कोरोना योद्धांच्या बाबतीत प्रशासनाने खरी करुन दाखविली आहे.