नवीन गारचे तलाठी कार्यालय पूर्ववत न झाल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:06+5:302021-04-06T04:10:06+5:30
दौंड: गेल्या दोन वर्षापासून नवीन गार येथील तलाठी कार्यालय दौंड येथे आहे. तलाठी कार्यालयासंबंधित कामासाठी ग्रामस्थांना दौंडला जावे लागत ...
दौंड: गेल्या दोन वर्षापासून नवीन गार येथील तलाठी कार्यालय दौंड येथे आहे. तलाठी कार्यालयासंबंधित कामासाठी ग्रामस्थांना दौंडला जावे लागत असते. एका हेलपाट्यात काम कधीच होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय असल्याने हे तलाठी कार्यालय नवीन गार येथेच पूर्ववत करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्या मोहिनी निवंगुणे यांनी दिला आहे.
नवीन गार ते दौंड साधारणता १५ कि. मी. चे अंतर आहे. तलाठी कार्यालया अंतर्गत शासकीय कामकाजासाठी ग्रामस्थांना दौंडला यावे लागते. यात ग्रामस्थांचा वेळ जातो त्याच बरोबरीने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. एवढी धावपळ करुन देखील तलाठी जागेवर सापडेल याची शाश्वती नसल्याने केवळ एका कामासाठी नवीन गार ते दौंड चार ते पाच वेळा हेलपाटे मारावे लागते. परिणामी, ग्रामस्थांना हैराण होण्यापलीकडे दुसरा काही पर्याय नसतो.
सध्या कोरोनाचे संकट चोहीकडे असताना केवळ तलाठी कार्यालयाअभावी गावपातळीवरच्या कामकाजासाठी ग्रामस्थांना दौंडला हेलपाटे मारावे लागत आहे. वास्तविक पाहता जिथ गाव, तिथ तलाठी कार्यालय असणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत गावापासून १५ कि.मी. अंतरावर तलाठी कार्यालय असणे ही महाराष्ट्रातील पहिली बाब असावी . त्यातच नवीन गार गाव अडवळणीत असल्याने दळणवळणाची साधने नाहीत ज्यांच्याकडे स्वःताच्या गाड्या आहेत अशी लोक दौंडला तातडीने येतात मात्र शासनाची कुठलीही दळणवळण सोय नाही आणि स्वत:ची वाहने नाही अशा लोकांनी काय करायचे ? असा प्रश्न उपस्थित करत नवीन गार येथे तलाठी कार्यालय पुन्हा सुरू करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा निवंगुणे यांनी दिला आहे.
नवीन गार येथील तलाठी कार्यालय दौंड येथे कार्यरत कसे ? याबाबत मंडल अधिकारी यांना संबंधित तलाठ्याला नोटीस काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
संजय पाटील तहसीलदार , दौंड
०४ दौंड