...कारखान्यावर दिवाळी तरी कशी गोड लागणार, ऊसतोडणी कामगारांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:34 AM2018-11-10T00:34:27+5:302018-11-10T00:36:49+5:30
कशाची दिवाळी..... कशाचं काय.. पहाटे चारला उठायचं भाकरी थापायच्या..आणि भाकर चटणी फडक्यात गुंडाळून निघायचं ऊस तोडायला... लहान पोरं गावाकडे आणि आम्ही कारखान्यावर दिवाळी तरी कशी गोड लागणार...
सोमेश्वरनगर - कशाची दिवाळी..... कशाचं काय.. पहाटे चारला उठायचं भाकरी थापायच्या..आणि भाकर चटणी फडक्यात गुंडाळून निघायचं ऊस तोडायला... लहान पोरं गावाकडे आणि आम्ही कारखान्यावर दिवाळी तरी कशी गोड लागणार, अशा शब्दांत तांबाराजुरी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील सविता आणि सोमनाथ तांबे या दांपत्याने त्यांची अगतिकता व्यक्त केली.
मंत्री समितीने या वर्षी २० आॅक्टोबरला साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे बीड, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून लाखोंच्या संख्येने येणारे ऊसतोडणी कामगार दसरा झाल्यावरच साखर कारखान्यांवर दाखल झाले. त्यामुळे या कामगारांची यंदाची दिवाळी उसाच्या फडातच गेली. सविता तांबे पुढे सांगतात, ‘पहाटे उठल्यापासून राब राब राबायचं, रात्रीचे अकरा वाजतात झोपायला.
दिवाळी करायला सवड हाय कुणाला?’
ऊसतोडणी कामगारांना दिवाळी सणाचं काहीच कौतुक नाही. लहान मुलं इथं तर थोडी मोठी पोरं गावाकडे. त्यांना ठेवून दिवाळीचा घास कडूच लागणार ना? दोन-चार लाडू केले तर केले नाहीतर बाजरीची भाकरी आणि झुणका हाटून खायचा.. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम.
गावाकडून ऊस तोडायला येताना मुकादमाकडून उचल घ्यायची. सहा महिने राब राब राबून पोटाला चिमटा काढून उचल फेडायची. घेतलेल्या उचलीमधून पोरांची शिक्षणं आणि लग्न करायची. दिवसभर तोडलेल्या उसाचे वाढे विकून रोजचं तेल-मीठ भागवायचं,असेच चित्र बहुतांश ऊसतोडणी कामगारांचे आहे.
कारखाना कार्यक्षेत्रात धूमधडाक्यात दिवाळी साजरी होत असताना ऊसतोडणी कामगारांच्या झोपडीत अजून अंधारच आहे. या वर्षी अनेक ऊसतोडणी कामगारांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी म्हाताऱ्या आईवडिलांच्या भरवशावर गावकडंच ठेवलं आहे. गावाकडे सध्या प्यायला पाणी नाही.
टठत्यामुळे बहुतांश कामगारांनी गाव सोडून साखर कारखान्यावर येणे पसंत केले आहे.
कामगारांची दिवाळी अळणीच...
कारखाना परिसरामध्ये दिवाळी साजरी होत असताना ऊसतोडणी कामगारांच्या झोपडीत मात्र दिवाळीचा दिवा पेटलाच नाही. घरात गोडधोड नाही, मुलांना कपडे नाहीत की फटाके नाही... नशिबात आहे ते फक्त रोज राब राब राबणं असे ऊसतोडणी कामगारांनी सांगितले.