‘आगोटा पागोटा घालीन झिंगोटा अन् सईबाईचा कोंबडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:33+5:302021-08-19T04:15:33+5:30
पुणे : श्रावण महिना अर्थात व्रतवैकल्ये, सणावारांची रेलचेल! मंगळागौरीमुळे श्रावणातील आनंदात आणखीनच भर पडते. झिम्मा, फुगडी, पिंगा अशा खेळांनी ...
पुणे : श्रावण महिना अर्थात व्रतवैकल्ये, सणावारांची रेलचेल! मंगळागौरीमुळे श्रावणातील आनंदात आणखीनच भर पडते. झिम्मा, फुगडी, पिंगा अशा खेळांनी रंगलेली मंगळागौर चैतन्य, उत्साह निर्माण करते. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत बहुतांश मंगळागौरीचे खेळ आॅनलाईन सादर झाले. यंदा निर्बंध शिथिल झाले असल्याने मंगळागौरीच्या प्रत्यक्ष खेळांना पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र, खेळांमध्येही सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळले जात आहे.
श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. नवविवाहितांसाठी ही पर्वणीच असते. यावेळी सकाळच्या वेळेत महिला एकत्र येऊन पूजा करतात आणि संध्याकाळी खेळ खेळण्याचा, जागरणाचा प्रघात आहे. मागील वर्षी डिजिटल मंगळागौरींवर भर देण्यात आला.
पुण्यातील इंद्राणी ग्रूपने ‘न्यू नॉर्मल’ला सामोरे जात सादरीकरणातही छोटे बदल करत याही वर्षी नवचैतन्याने कार्यक्रमांना सुरूवात केली. आजवर ग्रुपने ६८० कार्यक्रमांचा टप्पा पार केला. सर्व जणींनी प्रथम लस घेऊन यंदाचे कार्यक्रम सुरू केले आहेत.
इंद्राणी ग्रुपच्या सुचेता आडकर म्हणाल्या, ‘आगोटा पागोटा घालीन झिंगोटा, सॉनिटायझर मास्क लावीन म्हणते, कोरोनाला दूर सारीन म्हणते आगोटा पागोटा’ किंवा ‘सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, फळे नि ताजी भाजी ठरतील गुणकारी’, अशा पद्धतीने गाण्यातून आणि निवेदनातून आम्ही स्वच्छता, आरोग्य, पारंपरिक आहार पद्धती याचे महत्त्व सांगत आहोत. यंदा सामाजिक अंतर, मास्क आणि इतर अत्यावश्यक गोष्टींचे पालन करत आमची घोडदौड सुरु आहे. समस्त जनांनी याचा अंगीकार केला असून पुनश्च हरी ओम म्हणत परत कार्यक्रमांची संख्या वाढतेय, हे आनंदाने नमूद करावेसे वाटते.’
-----------------------
मागील वर्षी आॅनलाईन खेळांवर भर देण्यात आला. फेसबुक लाईव्हची संकल्पनाही लोकप्रिय झाली. यंदा खेळ पुन्हा प्रत्यक्ष सुरू झाले असले तरी मर्यादित लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. आमच्या ग्रूपमधील सर्व महिलांनी लस घेतली आहे. पूर्वी मंगळागौरीचे खेळ खेळताना यजमानांना, पाहुण्यांनाही समाविष्ट करुन घेतले जायचे. आता एकमेकांमध्ये मिसळणे टाळले जाते. पाहुण्यांना खेळ खेळायचे असल्यास त्यांच्यासाठी आम्ही गाणी म्हणतो आणि ते त्यावर ठेका धरतात. मंगळागौरीच्या गाण्यांमध्येही कोरोनातील नियमांचा संदेश देणाऱ्या ओळी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
- सुचेता आडकर, इंद्राणी ग्रुप
फोटो - मंगळागौर