महाराष्ट्र साहित्य परिषद-पंजाब साहित्य अकादमीत सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:34 PM2017-10-25T15:34:42+5:302017-10-25T15:39:51+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यापुढील काळात साहित्याचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आणखी पुढे टाकण्यात आले आहे.
पुणे : घुमानमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धागा विणला गेला. यापुढील काळात मराठी-पंजाबी भाषा भगिनींचा स्नेह अधिक दृढ होण्याबरोबरच साहित्याचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आणखी पुढे टाकण्यात आले आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या सामंजस्य करारावर पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव सिंग सिरसा, सचिव डॉ. सुरजित सिंग, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, सरहदचे संजय नहार, पहिल्या विश्वपंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरजित पातर यांच्या स्वाक्षर्या आहेत. मसाप आणि पंजाबी साहित्य अकादमी या दोन संस्थांमधल्या या सामंजस्य करारात सरहद पुणे समन्वयकाची भूमिका बजावणार आहे.
मसाप ही १११ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली साहित्यातील मातृसंस्था आहे तर पंजाबी साहित्य अकादमीला ६३ वर्षांची वाडमयीन परंपरा आहे. 'वेगळ्या राज्यातील दोन साहित्यविषयक काम करण्यार्या आणि समृद्ध परंपरा असणार्या महत्वाच्या साहित्य संस्थांनी सामंजस्य करार करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. या करारामुळे या दोन भाषांमध्ये भाषिक सौहार्द तर निर्माण होईलच त्याचबरोबर उत्तम मराठी साहित्यकृतींचा पंजाबीत आणि पंजाबी साहित्यकृतींचा मराठी अनुवाद व्हावा यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. दोन्ही भाषांतील लेखकांना संवादासाठीचे एक हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. दोन्ही राज्यात दोन्ही भाषांतील पुस्तकांची प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. शासनाच्या पातळीवर दोन्ही भाषांच्या अभिवृद्धीसाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जाणार आहेत. संशोधनाबरोबर, संमेलन आणि कार्यशाळांचे आयोजन करण्याबरोबर प्रतिवर्षी दोन्ही भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठीतील अभिजात साहित्यकृती पंजाबी साहित्य अकादमीच्या ग्रंथालयात तर पंजाबीतील उत्तम साहित्यकृती मसापच्या ग्रंथालयात उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.