पुणे मेट्रोसाठी परदेशी वित्तीय संस्थांसोबत तब्बल १ हजार ३५० कोटी रूपयांचा करार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:39 PM2021-05-08T18:39:41+5:302021-05-08T18:40:40+5:30
पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबी चे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
पुणे: शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय व युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (इआयबी) यांच्यात १५० दक्षलक्ष युरोंच्या ( १३५० कोटी रूपये) वित्तीय करारावर शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.
पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबी चे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, के. राजारामन यांनी भारत सरकारच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली. तर इआयबी चे उपाध्यक्ष क्रिस्तियन केटल थॉमसन यांनी इआयबी च्या वतीने स्वाक्षरी केली.
इआयबी ने पुणेमेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एकूण ६०० दक्षलक्ष युरोंचे कर्ज मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०० दशलक्ष युरोंचा वित्तीय करार २२ जुलै २०१९ रोजी करण्यात आला होता. त्यातून झालेल्या कामाचा आढावा घेऊन वित्तीय कंपनीने कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे.
या दुसऱ्या टप्प्यातील कर्जातून आता मेट्रोसाठीच्या कोचची (डबे) खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेड (महामेट्रो) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग यात आहेत. एकूण अंतर ३१ किलोमीटरचे असून त्यामधील शिवाजीनगर ते स्वारगेट हे ५ किलोमीटरचे अंतर भुयारी आहे. संपुर्ण प्रकल्प ११ हजार ५०० कोटी रूपयांचा आहे. इआयबी शिवाय अन्य काही परदेशी वित्तीय कंपन्यांकडूनही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी कर्ज घेण्यात आले आहे.