कृषी पदव्युत्तर सीईटीचा शुक्रवारी निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:46 PM2018-04-12T17:46:11+5:302018-04-12T17:46:11+5:30
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत सीईटी घेण्यात आली होती. एकुण १८ हजार ३७८ विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी अर्ज केले होते.
पुणे : राज्यातील कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश (सीईटी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१३) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत सीईटी घेण्यात आली होती. एकुण १८ हजार ३७८ विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पात्र विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमांकानुसार ३९ पदव्यत्तर पदवी महाविद्यालयातील दहा विद्या शाखांच्या एकुण १३२२ जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. मंडळामार्फत शुक्रवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना रात्री बारा वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थी आपले गुणपत्रक संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकतात. तसेच निकालाबाबत शंका असल्यास निकाल जाहीर झाल्यापासून सात दिवसांच्या आत फेरतपासणीसाठी परीक्षा नियंत्रक कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल, अशी माहिती मंडळाचे परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी दिली.
दरम्यान, मंडळामार्फत गुरूवारी (दि. १२) सीईटीमध्ये विद्याशाखेनिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यानुसार कृषी अभ्यासक्रमात रुपेश बोबडे या विद्यार्थ्याने ८९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. इतर विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचे नावे पुढीलप्रमाणे (विद्याशाखा) - विशाल म्हेत्रे (उद्यानविद्या), छतांथू बाबू अंजना बाबु छतांथू नारायण (वनशास्त्र), अजय सातपुते (कृषी अभियांत्रिकी), कांचन स्नेहा सत्येंद्र (अन्नतंत्रज्ञान), दिक्षा मोरे (गृहविज्ञान), दिव्याजीत गोरे (मत्स्यशास्त्र), अक्षय बांडे (कृषी जैवतंत्रज्ञान), अनुराधा वाव्हळे (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) आणि मुकूंद डवले (काढणीपश्चात व्यवस्थापन).