कृषीपंप जोडणीची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:07+5:302020-12-11T04:30:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : वीज वितरणातील हानी रोखण्यासाठी महावितरणने वीज चोरांविरोधात मोहीम उघडली आहे. त्या अंतर्गत कृषी पंप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वीज वितरणातील हानी रोखण्यासाठी महावितरणने वीज चोरांविरोधात मोहीम उघडली आहे. त्या अंतर्गत कृषी पंप वीज जोडणीची तपासणी करण्यात येणार असून, अनधिकृत कृषी पंप वीज जोडण्या काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊन (टाळेबंदी) नंतर महावितरणची वीज बिल थकबाकी वाढली आहे. त्यामुळे महावितरण समोर आर्थिक संकट उभे राहीले आहे. अगदी, दैनंदिन गाडा हाकण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांशी संवाद साधत वीजबिल भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्याच बरोबर प्रत्येक विभागनिहाय वीज वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी विज चोरी विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. अैाद्योगिक, वाणिज्य, कृषी आणि इतर वर्गवारीतील वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज जोडणीची तपासणी करण्यात येत आहे. तसेच अनधिकृत वीज जोडणी काढून टाकण्यात येत असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून या मोहीमेला गती देण्यात आली आहे.
रब्बी हंगामामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपाचा वापर केला जातो. त्या पार्श्वभूमीवर कृषी पंपांसह संबंधित रोहित्रांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.