पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कृषी केंद्र सुधारित वेळेत सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 03:47 PM2021-05-18T15:47:58+5:302021-05-18T15:48:04+5:30
बी बियाणे- खते खरेदीसाठी कृषी केंद्र दिवसभर सुरु ठेवण्याची शेतकऱ्यांनी केली होती मागणी
पुणे: पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुरुवात झाली असताना कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषेदचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी कृषी केंद्र दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रामुख्याने पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये खरीपाची लगबग चालू झाली आहे. त्या अनुषंगाने काल पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना त्यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेतली. त्यांना कृषी केंद्र सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यांनी त्वरित जिल्हा कृषी अधिकारी बोटे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
सविस्तर चर्चेनंतर त्यांनी दुपारी २ पर्यंत कृषी केंद्र शेतकऱ्यांसाठी चालू राहण्याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच केले. तसेच शेतकऱ्यांना बांधावर खते, बी- बियाणे पुरवण्यासाठी जास्तीत जास्त नियोजन करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहेत. अशी माहिती शिवतरे यांनी दिली.