कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Published: December 8, 2014 01:16 AM2014-12-08T01:16:50+5:302014-12-08T01:16:50+5:30
लॅपटॉप चोरीचा आळ घेऊन दारू आणि गुटख्यासाठी पैसे आणून देण्यासाठी मित्रांकडूनच होणाऱ्या छळाला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली
पुणे : लॅपटॉप चोरीचा आळ घेऊन दारू आणि गुटख्यासाठी पैसे आणून देण्यासाठी मित्रांकडूनच होणाऱ्या छळाला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कृषी महाविद्यालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये एका मुलीचा समावेश आहे.
कुलभूषण शंकर थोरात (वय १७, रा. शिवाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी अंकिता राजेंद्र निकम, सचिन खोमणे, रोहित मोरे, शाहदाब शेख, विनोद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे वडील शंकर थोरात यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील नरवीर तानाजीवाडी परिसरातील एका खासगी इमारतीमध्ये तो अन्य विद्यार्थ्यांसोबत राहण्यास होता. २६ नोव्हेंबरपासून आरोपींनी थोरातवर लॅपटॉपच्या चोरीचा आळ घ्यायला सुरुवात केली होती. त्याला सतत चोर चोर म्हणून चिडवण्यात येत होते. दारू प्यायला आणि गुटखा खाण्यासाठी त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चोरी करून पैसे घेऊन ये असे म्हणत दमदाटी करीत होती. (प्रतिनिधी)