पिवळे कलिंगड खातेय भाव! पुरंदर तालुक्यातील पहिलाच प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:35 AM2018-05-05T03:35:10+5:302018-05-05T03:35:10+5:30
शेतीला आधुनिक तंत्राची जोड दिली तर शेती फायदेशीर होते. पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील उच्चशिक्षित प्रियंका मेमाणे यांनी आधुनिक तंत्राची जोड देऊन आधुनिक शेतीचा प्रयत्न केला आहे. मेमाणे कुटुंबीयांनी पारगाव मेमाणे येथे अक्षरश: माळरानावर दहा एकर क्षेत्र विकसित केले आहे.
जेजुरी - शेतीला आधुनिक तंत्राची जोड दिली तर शेती फायदेशीर होते. पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील उच्चशिक्षित प्रियंका मेमाणे यांनी आधुनिक तंत्राची जोड देऊन आधुनिक शेतीचा प्रयत्न केला आहे. मेमाणे कुटुंबीयांनी पारगाव मेमाणे येथे अक्षरश: माळरानावर दहा एकर क्षेत्र विकसित केले आहे. यातील सहा एकर क्षेत्रावर डाळिंब, सीताफळ, पेरु यांच्या फळबागा निर्माण केल्या आहेत. पाण्याच्या नियोजनासाठी शेताच्या एका बाजूला ११०७/१४० फूट लांबी, रुंदीचे एक कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळे निर्माण केले आहे. प्रियंका मेमाणे यांनी स्वत: पुढाकार घेत यातीलच एक एकरावर सेंद्रिय वाण असलेल्या पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आहे.
तैवानच्या नोन यू सीड्स कंपनीने विकसित केलेले आतून लाल आणि बाहेरून पिवळा रंग असणारे विशाला जातीचा वाण आणि बाहेरून हिरवा मात्र आतून पिवळा असणाऱ्या मस्तानी वाणाची लागवड करून एक वेगळी शेतीची पायवाट अवलंबली आहे. या दोन्ही वाणांबरोबर मन्नत जातीच्या कलिंगडाचीही लागवड केली आहे. मेमाणे यांचा हा पुरंदर तालुक्यातील पहिलाच प्रयोग असून, या पिवळ्या रंगाच्या कलिंगडाने चांगलाच भाव खाल्ला आहे.
या तीनही जातीच्या कलिंगडांना सरासरी १५ रुपये किलोचा दर मिळाल्याने त्यांना यातून मोठे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत त्यांनी १० टन कलिंगडाची विक्री करून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. शिवाय अजूनही १५ टन माल शेतात आहे. साधारणपणे २५ टनापेक्षा जास्त माल मिळणार याची खात्री असल्याने तीन लाखांवर उत्पन्नाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.