पुण्यात MPSC विरोधात कृषी पदवीधरांचे आंदोलन; हजारो विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:33 PM2024-08-21T12:33:46+5:302024-08-21T12:34:18+5:30
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही, तसेच नवीन पदांची जाहिराती प्रसिद्ध केली जात नाही
पुणे: कृषी विभागातील २०२१ तसेच २०२२ मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. तसेच २०२३ आणि २४ मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्या लायब्ररी समोर एकत्रित येत आंदोलन केले. रस्त्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी रस्त्यावर जमा झाले होते. आज सकाळी सुद्धा हजारो विद्यार्थी पुन्हा लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा झाले आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही. तसेच नवीन पदांची जाहिराती प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या कृषी पदवीधरांची कोंडी झाली आहे. वय वाढत चालले असून आमच्या भविष्याचे काय? असा प्रश्न कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकतेच २५८ पदे एमपीएससीकडे भरती साठी वर्ग केली आहेत. हे पदे २०२४ च्या जाहिरातीत समाविष्ठ करावीत आणि परीक्षा घ्यावी. त्यामुळे कृषिप्रधान देशात कृषी पुत्रांना न्याय मिळेल अशा भावना आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.