उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल
By नितीन चौधरी | Published: September 22, 2022 08:55 PM2022-09-22T20:55:55+5:302022-09-22T20:55:55+5:30
कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते...
पुणे : “महाविकास आघाडी सरकारच्या दुकांनामधून वाईन विकण्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्यास वाईन परवान्याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील,” असे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, “चारही कृषी विद्यापीठांच्या अडचणी गुरुवारच्या बैठकीत जाणून घेतल्या. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी दर्जेदार शिक्षण द्यावा असा प्रयत्न आहे. भविष्यात शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल या दृष्टीने चर्चा केली. शेती क्षेत्रात अनेक नवीन रोग आले, ते नष्ट कसे होतील यावर कायमस्वरुपी उपाय शोधले जातील.
वाईन धोरणासंदर्भात शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात येतील. कृषीमंत्री म्हणून मी याबाबत सकारात्मक आहे. यापुढे राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शेतकऱ्यांना काय अडचणी येतात ते जाणून घेऊ, असेही सत्तार म्हणाले.
शिक्षण विभागाची यादी बनावट
माझ्या मुलीचा पगार २०२० मध्येच बंद झाला होता. टीईटी घोटाळ्याबाबत अनेक आरोप झाले आहेत. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्या वेळी माझ्यावर आरोप होतात. मी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चाैकशीची विनंती केली आहे. त्यानंतर मुख्य सचिव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही यादी शिक्षण विभागाने केलेली नाही. ही यादी बनावट आहे, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला.
गेल्या सरकारने काहीच केले नाही
“मला आश्चर्य वाटत आहे. गुजरात सरकारने ज्या सुविधा देत आहे त्या आपण द्यायला हव्या होत्या, खरेतर आधीच्या सरकारमध्ये मी होतो, आदित्य ठाकरे होते ही सामूहिक जबाबदारी होती, आम्ही त्यात कमी पडलो. मागच्या सरकारने २ वर्ष काहीच केले नाही. माजीमंत्री सुभाष देसाई हे तर आमचाही रामराम घेत नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा टोलाही सत्तार यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी जे केले ते योग्य होते का?
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत सत्तार म्हणाले, “मी फार जवळून त्यांना बघितले नाही, भाजपसोबत युती तोडल्यानंतर त्यांनी जे केले ते इमानी इतबारे होते का? एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. रिक्षावाला म्हणून ओळखतात मग रिक्षामध्ये ५० लोक (आमदार) कसे बसलेत याचा विचार केला का? शिवसेनेने सत्ता स्थापन करताना जो धोका दिला तेव्हा ती सती सावित्री होती का?,” असा सवालही सत्तार यांनी केला.