कृषी अधिकारी-कर्मचारी जाणार शेतीच्या बांधावर: सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 09:40 PM2018-06-04T21:40:37+5:302018-06-04T21:40:37+5:30
पेरणी कालावधीत बांधावर जाऊन बियाणे, खते अधिकृत आणि कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे वापरली जातात की नाही हे या भेटीदरम्यान पाहिले जाईल.
पुणे : कोणत्या पिकाची पेरणी होते, खते आणि बियाणांचा कसा वापर शेतकरी करतात याची अचूक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागातील शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना बांधावर जाण्याचा आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी दिला.
खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. खोत म्हणाले, कृषी विभागाचा प्रत्येक अधिकारी कर्मचारी बांधावर जाईल असे नियोजन करण्यात आले आहे. अनेकदा पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बियाणांची तक्रार केली जाते. त्यामुळे पेरणी कालावधीत बांधावर जाऊन बियाणे, खते अधिकृत आणि कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे वापरली जातात की नाही हे या भेटीदरम्यान पाहिले जाईल. तसेच, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अधिकाºयांमार्फत खते आणि बियाणांची निवड, तसेच वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
बोगस किटकनाशके, खते, बियाणांच्या विक्रीला आळा बसावा यासाठी तालुका, जिल्हा आणि आयुक्तालय स्तरावर पथके स्थापन करण्यात येतील. या तपासणीत संबंधित परवानाधारकाकडे परवान्या व्यतिरिक्त इतर बियाणे आणि किटकनाशके आढळल्यास संबंधिताचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच, त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील दिली जाईल. प्रत्येक परवानाधारकाने मालाची पावती देणे बंधनकारक आहे. विनापावती विक्री करताना आढळल्यास, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
गेल्या वर्षी बोंड आळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ हजार ६०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस उत्पादन क्षेत्रात तालुकानिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच, कापसाचे देशी वाण वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदा १५२ लाख हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज असल्याचे खोत म्हणाले.
------------------------
सेल्फी विथ फार्मर
पिकांच्या पेरणीचा यंदाचा कल समजावा, बियाणे आणि खतांचा वापर कृषी विभागाच्या शिफारशींनुसार होतोय की नाही, हे पाहण्यासाठी या खरीप हंगामापासून कृषी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शेताच्या बांधावर जावे लागणार आहे. बांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यासोबत संबंधिताला सेल्फी देखील काढावा लागणार आहे. तशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खरीप आढावा बैठकीत दिल्या. त्याबाबत पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता त्यांनी सेल्फीबाबत बोलणे टाळले. मात्र, शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व व्यक्ती बांधावर जातील, असे त्यांनी सांगितले.