शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन नाही तर व्यवसाय म्हणून पाहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:22+5:302021-04-06T04:09:22+5:30
(रविकिरण सासवडे) बारामती: शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता व्यावसाय म्हणून पाहायला शिकले पाहिजे आणि व्यवसाय म्हटलं की ...
(रविकिरण सासवडे)
बारामती: शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता व्यावसाय म्हणून पाहायला शिकले पाहिजे आणि व्यवसाय म्हटलं की थोडसं तरी धाडस दाखवायला हवं. याच जाणिवेतून उसाच्या पट्ट्याात असून सुद्धा दहावर्षांपूर्वी पॉलिहाऊस शेतीकडे आम्ही वळलो. सुरूवात अगदी १० गुंठ्यांपासून केली. आज माझ्याकडे २ एकर पॉलिहाऊस उभे आहे. पॉलिहाऊसमधील कॅपस्किन ढोबळी मिरची यशस्वी उत्पादनाचे सातत्य आम्ही राखले आहे. त्यामुळे साहजिकच अनेक संकटातून उभी केलेली आमची शेती आज आदर्शवत झाली आहे, असा अनुभव कांबळेश्वर (ता. बारामती) येथील आशा शिवाजी खलाटे यांनी सांगितला.
नुकताच राज्यशासनाच्या वतीने आशा खलाटे यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये नक्की वाढ करता येते. आशाताई सांगतात की, माझे शिक्षण १० वीपर्यंत झाले. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्याने मला शेती व्यवसायाची आवड होती. या आवडीतून आमची शेती फुलत आहे. वर्षाचे १२ महिने आमच्याकडे ढोबळी मिरचीचे पीक असते. आमची ढोबळी मिरची दादर, दिल्ली, कलकत्ता आणि पटना मार्केटला विक्रीसाठी जाते. आतापर्यंत कॅपस्किन ढोबळी मिरचीला सरासरी ५५ ते ६० रूपये दर मिळाला आहे. १० गुंठे क्षेत्रातून आम्ही दरवर्षी १४ ते १५ टन ढोबळी मिरचीचा माल उत्पादित करतो. तत्पूर्वी २०१२ साली आम्ही बँकेच्या साह्याने १० गुंठे क्षेत्रावर हरितगृहाची उभारणी केली. त्यामध्ये रंगीत मिरचीची लागवड केली व पहिल्याच वर्षी उत्पन्न चांगले मिळाले व दरही चांगले मिळाल्याने खूप मोठा फायदा झाला. त्यामुळे दुसऱ्या वर्षी १० गुंठे हरितगृहाची पुन्हा उभारणी केली असे एकूण २० गुंठे हरितगृहाची उभारणी झाली. ऐनवेळी उत्पादन सुरु झाले आणि पाणी कमी पडले अशा परिस्थितीत रंगीत मिरचीचे पीक पाण्याअभावी जळून जाण्याची भीती व बँकेचे कर्ज अशा दोन्ही बाजूने अडचणी निर्माण झाल्या होत्या.
परंतु न डगमगता अक्षरश: मिरचीला टँकरने पाणी दिले. ठिबक सिंचन व आधुनिक पद्धतीच्या तुषार सिंचनाच्या (फोगर) च्या वापरामुळे सर्व क्षेत्र भिजले गेले. पिकांची निवड करताना आम्ही नेहमी मागील बाजार भावाचा अंदाज घेऊन त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब व पिकांच्या नवीन जाती घेण्यावर भर देत आहोत. हरितगृहाची उभारणी केल्यानंतर थाय पिंक या नवीन पेरू जातीची १ एकर क्षेत्रात लागवड केली आहे. शेतातील अडीअडचणी सोडविण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राची व आमच्या कार्यक्षेत्रातील कृषी अधिकारी यांची आम्हाल नेहमीच मोलाची मदत होते. शेतात हिरवळीची खते, ६० टक्के शेणखत, गांडूळखत, विविध अन्नद्रव्य व ४० टक्के नत्रस्फुरद व 'पालाश ही खते तसेच सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर गरजेनुसार केला जातो.
--------------------------
अनुभव आणि निरीक्षणातून शिकलो...
दहा-बारावर्षांपूर्वी शेती केवळ उपजीविका म्हणून करीत होतो. ऊसपट्ट्यात राहत असल्याने ऊस हेच आमचे प्रमुख पीक होते. मात्र सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी कर्जाच्या फेऱ्यातून कधी बाहेर निघत नाही. दर वर्षी कर्जाचे प्रकरण नवे-जुने करून खाते सुरू ठेवले जाते. यामधून शेतकरी फक्त जगून निघतो. त्यामुळे आम्ही यामधून बाहेर पडायचे असे ठरवले. खूप फिरलो. नवनविन शेतीप्रयोग पाहिले. त्या अनुभवातून व निरीक्षणातून पत्नी आशा व मुले खूप शिकली. त्यातूनच माझ्या आजारपणामुळे मी शेतीच्या दैैनंदिन कामातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जिद्दीने हा व्यवसाय पुढे नेला, असा अनुभव आशाताईंचे पती शिवाजीराव खलाटे यांनी सांगितला.
कांबळेश्वर येथील जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी आशा खलाटे, पती शिवाजीराव खलाटे व मुलगा गणेश खलाटे पॉलीहाऊसमधील कॅपस्किन ढोबळी मिरचीचे पीक दाखवताना.
०५०४२०२१-बारामती-१