कृषी स्टार्टअपला सहकाराचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:33 AM2018-08-08T05:33:30+5:302018-08-08T05:33:33+5:30
शेती व्यवसायातील ‘स्टार्ट अप’ उद्योगांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.
- विशाल शिर्के
पुणे : शेती व्यवसायातील ‘स्टार्ट अप’ उद्योगांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. काही प्रकल्पात महामंडळामार्फत गुंतवणूक देखील केली जाणार आहे.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित ही सरकारने स्थापन केलेली कंपनी २००० साली अस्तित्वात आली. सहकाराला बळ देण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. मात्र, गेल्या १७ वर्षांपासून या कंपनीचे कामकाज बंद होते. सहकार मंत्रालयाने या संस्थेचे पुनरुज्जीवन केले असून, त्या अंतर्गत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा (आरबीआय) नॉन बँकींग फायनान्स कंपनीचा परवाना मिळविला आहे. या कंपनीच्या माध्यमातून कृषी व्यवसाय आणि सहकारी संस्थांना वित्तपुरवठा, कृषी व्यवसाय व सहकारासाठी सल्लागार आणि कृषी व्यवसाय आणि सहकारी संस्थांचा कौशल्य विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. राज्य सरकार, आशियाई विकास बँक, जागतिक बँकेकडून निधीची उभारणी करण्याचे काम केले जाईल.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नुकताच या उपक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यात कृषी आणि सहकार विभागातील स्टार्ट अप्स उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी ‘व्हेंचर कॅपिटल फंडा’ची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. जमा झालेल्या निधीत ५१% भर सरकार घालेल, असे स्वरूप आहे.
>उपक्रम आणि उद्दिष्टे
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, तसेच जलसमृद्धी योजनेमध्ये नोडल एजन्सी म्हणून महामंडळ काम पाहणार आहे.
सहकारी संस्थांची उत्पादने एका छताखाली आणून ब्रँड तयार करणे
कृषी आणि सहकार क्षेत्रातील कौशल्य वाढीसाठी १ लाख व्यक्तींचे प्रशिक्षण करणे