राज्यात १० जिल्ह्यात होणार कृषी हवामान पर्जन्य मापन केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:56+5:302021-03-23T13:34:02+5:30
पुणे : शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील हवामान , पाणी, जमीन याविषयी माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हवामान विभागाच्या वतीने देशभरात २०० ...
पुणे : शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील हवामान, पाणी, जमीन याविषयी माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हवामान विभागाच्या वतीने देशभरात २०० कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्रे सुरु करणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील १० केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांची उभारणी सुरु केली असून येत्या पावसाळ्याच्या आत ती कार्यन्वित होणार आहे.
याबाबत उपकरण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जमिनीतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, त्यामुळे होणारे बाष्पीभवन हे पिकाच्या वाढीसाठी आणि पिकाला पाणी देण्यासाठी महत्वाचे असते. या कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांना तेथील जमिनीतील आर्द्रता, कमाल व किमान तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर जमिनीत किती खोलवर ओलावा आहे, जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता आहे, याची माहिती उपलब्ध करुन देणार आहे.
देशभरातील जवळपास २०० कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्राच्या उभारणीचे काम सध्या सुरु आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ही केंद्र सुरु होणार आहेत.
--
महाराष्ट्रातील केंद्रे
पालघर, सोलापूर, नंदुरबार, औरंगाबाद, उस्मानाबाद, वाशिम, नागपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये कृषी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्रे सुरु होणार आहेत.
---
क्लायमेट डेटा सर्व्हिस पोर्टलचे उद्घाटन
जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने हवामान विभागाकडून क्लायमेट डेटा सर्व्हिस पोर्टलचे मंगळवारी उद्घाटन अर्थ सायन्सचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्या हस्ते करणार आहे. यावेळी हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांच्या उपस्थितीत आनलाईन होणार आहे. डॉ. डी. एस. पै हे या पोर्टलबाबतची माहिती सांगणार असून डॉ. एस. डी. अत्री हे प्रास्ताविक करतील.
या पोर्टलमधील फोल्डरमध्ये देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील मागील १० वर्षातील तापमानाची तसेच सध्याच्या हवामानाची माहिती दिली आहे. सध्याचे हवामान व सरासरीमधील फरक तसेच पुढील काही दिवसांचा अंदाज याची माहिती असणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक के. एस. होसाळीकर हे असणार आहेत़.
---
नागरिकही देऊ शकणार माहिती
हवामान विभागाच्या या क्लायमेट डेटा पोर्टलवर नागरिकही आपल्या भागातील हवामानाची माहिती देऊ शकणार आहेत. सध्या हे दिल्लीत कार्यन्वित केले आहे. नागरिक या पोर्टलमधील फोल्डरवर गेल्यावर त्यांनी पब्लिक ऑबशवेशन वर क्लिक करुन ते त्यांच्याकडील असलेली माहिती, फोटो त्यात देऊ शकतील.
---
महासागर, हवामान आणि त्याचा संबंध
जागतिक हवामान दिनानिमित्त जागतिक हवामान विभागाने यंदा महासागर, हवामान आणि त्यांचा संबंध हे ब्रिद वाक्य घोषित केले आहे. पृथ्वीवरील ७० टक्के भुभाग हा महासागरांनी व्यापला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानाचे नियंत्रण ठेवण्याचे काम समुद्राद्वारे होत असते. सूर्याकडून येणारी ९० टक्के उर्जा समुद्राकडून शोषली जाते. ही उर्जा अधिक क्षमतेने शोषली गेल्यास समुद्राचे तापमान वाढून तीव्र चक्रीवादळे निर्माण होतात. भारतातील मान्सूनही विषुववृत्ताजवळील प्रशांत महासागरातील अल निनोवर अबलंबून असते. त्यामुळे पावसाळा येण्यापूर्वी आपल्याकडे अल निनोचा प्रवाह कसा आहे, यावर सर्वांचे लक्ष असते. जगातील ९० टक्के माल वाहतूक ही समुद्रमार्गे होत असते. त्याचबरोबर जगातील ४० टक्के लोकसंख्या ही समुद्राच्या जवळ राहते. त्यामुळे जगभरातील मानवाच्या दृष्टीने समुद्राचा संबंध त्यांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणावर होत असतो. समुद्राविषयी जनजागृती वाढविण्यासाठी यंदा जागतिक हवामान विभागाने हे ब्रीद वाक्य निवडले आहे.